अंदमान एक तीर्थक्षेत्र

अंदमान एक तीर्थक्षेत्र
प्रसाद दाबके

अंदमान एक तीर्थक्षेत्र 

अंदमान! तसं पाहिलंच तर काय नाहीये अंदमानमध्ये...? उत्तम समुद्र किनारे, समुद्री खेळ, स्वच्छ रस्ते, उत्तम जेवण, पर्यटकांची उत्तम सोय करणारे अनेक घटक आज अंदमानात आहेत आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. पण एका गोष्टीने मात्र आज अंदमानला जणू "तीर्थक्षेत्र' म्हणावं, अशी एक गोष्ट मात्र कुठल्याही पर्यटनस्थळी नाही. ती म्हणजे "सेल्युलर जेल'. तो क्रांतिकारकांचा मुकुटमणी सावरकरांनी आपली सोन्यासारखी वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यात काढली, तेच का त्यांच्यासारखे अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृतीने पावन झालेल्या या स्थळाला भेट देण्यास मीही इतरांसारखाच उत्सुक होतो .

चेन्नई विमानतळावरून आमच्या विमानाने झेप घेतली आणि साधारण दोन तासांनी खिडकीतून खाली पाहिलं, तर निळ्याशार पाण्यात तरंगणारी काही बेटं दिसत होती. त्यातील काही बेटं ही निकोबारची असून, तिथे जाण्यास नागरिकांना परवानगी नाही हे अर्थात नंतर आम्हाला समजले. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो त्या वेळेला "स्वा. विनायक दामोदर सावरकर हवाईअड्डा' हे नाव वाचून मनातल्या मनात नकळत आपले हात जोडले जातात. सगळे सोपस्कार आटपून बाहेर आलो, त्या वेळेला आमच्या स्वागताकरता तिकडचे यात्राप्रमुख हजरच होते. आजूबाजूला कुठेही नजर टाकलीत, तर जिकडे तिकडे नारळाची झाडे, हिरवीगार झाडी.. आणि समोर पसरलेला अथांग समुद्र. इथल्या हवेतच तुम्हाला इतिहासाचा सुगंध यायला लागतो. एकेकाळी काळ्या पाण्याची शिक्षा देण्याचं ठिकाण म्हणून अंदमान ब्रिटिशांनी कुप्रसिद्ध केलं होतं. हे सगळं आठवत हॉटेलवर आल्यावर काही काळ विश्रांती घेतली. जेवण करून पुन्हा ताजेतवाने होऊन बाहेर पडलो. अंदमानला अंधार लवकर पडतो. त्यामुळे वेळेचं भान पाळणं हे तिथे आवश्‍यक आहे. पण आज आम्ही "चिडिया टापू' या एकाच ठिकाणी जाणार असल्याने आम्ही तसे निर्धास्त होतो. अंदमानची आणखी एक खासीयत म्हणजे इथे लोकसंख्या कमी असल्यामुळे इथे प्रदूषण जवळपास नाहीच. त्यामुळे अंदमानचे सूर्योदय आणि सूर्यास्त बघायलाही इथे गर्दी असते. स्वच्छ हवा, स्वच्छ किनारे शिवाय गर्दीचीही फार भीती नाही. त्यामुळे पर्यटक गर्दी करतातच. चिडिया टापू नावातच लक्षात येईल की एका बेटावर एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला समुद्र अशी रचना असलेलं हे ठिकाण आहे. आणि खरोखरच आम्ही जेव्हा पोचलो पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते, एका मोठ्या उद्यानात आम्ही फिरत होतो आणि त्याच वेळेला समोरच्या बाजूला होत असलेला "सूर्यास्त' पुन्हा पुन्हा डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता.
संध्याकाळी आम्ही हॉटेलवर परत आलो. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून आम्ही "नॉर्थ बे आयलंड' वायपर आणि रोस येथे जाणार होतो. ही लहानशी बेटे आहेत. मात्र, येथे जाण्याकरिता तुम्हाला बोटीतून प्रवास करावा लागतो. वायपर आयलंडला अंदमानमध्ये "सेल्युलर जेल' तयार व्हायच्या आधी कैद्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात येत असे. शहरापासून दूर, एकांतस्थळी आजही तो भग्नावस्थेत असलेला तुरुंग पाहिला की अंगावर काटा येतो. त्याच ठिकाणी पूर्वी कैद्यांना फाशी देण्यात येत असे. तिकडून निघाल्यावर एक जुनी जेट्टी जाता जाता दिसते. तिथून नॉर्थ बे आयलंडला आलो की, त्या आयलंडवर सुंदर कोरल (प्रवाळ) ते बघण्यासाठी स्कुबा ड्रायव्हिंग किंवा स्नोर्कलिंगची सोय आहे. ती बघून आम्ही रोस आयलंडवर पोचलो. अत्यंत आटोपशीर झाडी, आजूबाजूला फिरणारे प्राणी हे बघून आपण अचंबित होऊन जातो, पण खरी मजा तर पुढेच आहे. आयलंडला पोचल्यानंतर एक छोट्या चणीची, कृश बाई आपल्याला दिसते, नव्हे आपले लक्ष वेधून घेते. अंदमानाविषयी, सावरकरांविषयी अत्यंत तिखट अभिमान असलेली ही बाई अनुराधा दीदी. पर्यावरण आणि भोवतालच्या प्राण्यांविषयी खरोखरच जिव्हाळा असलेली गाईड. त्यांनी हाक मारताच "राजू' नावाचं हरिण आणि ससे... धावत त्यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या हातात हात देतात आणि घास खातात. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. जणू आईने मुलाला हाक मारावी तसं. त्या दीदी एक चमत्कारच आहेत. अनेक वर्ष त्या तिथे राहून पर्यावरणाचा लढा देतायत. त्यांनी तिकडच्या प्राण्यांना अगदी लहान बाळासारखं वाढवलं आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही "हेवेलोक आयलंड'ला जायला निघालो. या आयलंडला पोचायचा प्रवास मात्र अतिशय सुंदर आहे.
निळ्याशार समुद्रवाटेमध्ये दिसणारे नील आयलंड, बोटीच्या कठड्यावर बसणारे समुद्री पक्षी यांनी तुमचा शीण कुठल्या कुठे पळून जातो. या आयलंडचं वैशिष्ट्य म्हणजे आशियातील अत्यंत सुंदर किनाऱ्यांपैकी एक समुद्रकिनारा याला लाभला आहे. ज्या दिवशी पोचलो त्याच दिवशी आम्ही "काला पत्थर' बीचला गेलो होतो. नावाप्रमाणेच जिकडे तिकडे काळेशार दगड पसरलेले आहेत. त्यामुळे इकडे समुद्र स्नानाला अडचणी येण्याची शक्‍यता आहे. पण इथून सूर्यास्ताचा नजारा मात्र सुंदरच दिसतो. सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही राधानगर बीचला जाऊन धडकलो. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा सुंदर असा हा बीच आहे. इथे मात्र तुम्हाला समुद्र स्नानाची यथेच्छ हौस भागवता येते. शिवाय या बीचवर समुद्रातील क्रीडा प्रकारांचाही आस्वाद घेता येतो. हेही शक्‍य नसेल तर... नारळाच्या झाडाखाली व शेकडो वर्ष जुन्या वृक्षांच्या सावलीत तुम्ही निवांतपणे पडून राहू शकता. हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्यामुळे साहजिकच इथे तुम्ही मनपसंत खरेदी करू शकता. दुपारी तिकडून निघून आम्ही संध्याकाळी मुकामांवर परत आलो.
अंदमानवरून निघायच्या एक दिवस आधी आम्ही शहरातील ठिकाणे बघण्यात घालवला. शहरात दोन-तीन मजली अनेक मोठी म्युझियम आहेत. या ठिकाणी माशांचे विविध प्रकार बघायला मिळतात व अगदी एक सेमीपासून दहा फुटांपर्यंतचे शंख, शिंपले या शिवाय कोरलही आहेतच. याच ठिकाणी आपल्याला अंदमानच्या संस्कृतीची ओळख होते. अंदमानातील मूळ आदिवासी, त्यांची हत्यारे, कपडे, राहणीमान, जुनी दुर्मिळ छायाचित्र हे बघताना अर्धा दिवस कसा निघून जातो हे लक्षातच येत नाही. साधारण दुपारनंतर सेल्युलर जेलचे दरवाजे उघडतात. त्या जेलच्या वेळेची आधी माहिती करून घेणं आवश्‍यक आहे. कारण दुपारी ते बंद असते. योग्य मूल्य दिल्यावर तुम्हाला आत प्रवेश मिळतो. या स्थळाचे शब्दात वर्णन करणे मात्र खरोखरच अवघड आहे. इथे आपण केवळ निःशब्द होऊन जातो. आज कदाचित त्या वेळेसारखी भयानक परिस्थिती नक्कीच नसली, तरी आपल्याला साधारण कल्पना येतेच. आतमध्ये फिरताना समोर दिसणारे फाशीघर, कैद्यांना ज्या टीकाटण्यावर मारायचे किंवा शिक्षा म्हणून फिरवायचा कोलू हे बघून मन विषण्ण होते. आमचा "गाईड' एक एक इतिहास उलगडत होता आणि आम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी आणि कॅमेऱ्याने ते क्षण बंदिस्त करत होतो. समोर वरच्या बाजूला एका कोपऱ्यात तीच खोली, तसेच जिने, तीच भक्कम लोखंडी दारे. इथे सर्व शब्द मूक होऊन जातात. वरच्या बाजूला साधारण नऊ फुटांवर ठेवलेली एक खिडकी आणि त्याच्या खाली सावरकरांचा फोटो. बास खोली संपली. खोलीतून खाली दिसणारे "फाशीघर' मुद्दाम कैद्यांच्या किंकाळ्या ऐकू याव्यात या करता केलेली योजना. त्या खोलीत गेल्यावर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलूनच येते आणि तोंडावाटे बाहेर पडतात सावरकरांची गीतं "जयोस्तुते....' संपूर्ण जेल फिरून तिकडे असलेलं एक संग्रहालय बघून आम्ही खाली उतरलो. थोड्याच वेळात लाइट आणि साउंड शो सुरू होणार होता, हा कार्यक्रम मात्र न चुकवावा असाच आहे. जणू पुन्हा आपण भूतकाळात शिरून आपल्यासमोर त्या घटना घडल्यात इतका त्याच्यात जिवंतपणा आहे. तिकडेच असलेल्या एका झाडाच्या प्रातिनिधिक रूपातून आपल्यासमोर पूर्ण इतिहास उलगडत जातो आणि आपण काहीशा सुन्न अवस्थेतच इथून बाहेर पडतो. तेव्हा लक्षात येतं नकळत आपले काही अश्रू जेलमध्येच राहिलेत जणू त्या क्रांतिकारकांना मानाचा मुजरा करण्याकरिता. एक अत्यंत रमणीय.. निसर्गाचा आणि इतिहासाचा वरदहस्त लाभलेलं तीर्थक्षेत्र, म्हणून सर्वांनी जरूर पाहिलंच पाहिजे.
सकाळी आम्ही पुन्हा पोर्टब्लेअरच्या विमानतळावर आलो. इथूनच आम्ही पुन्हा आपापल्या मुक्कामी जाणार होतो. विमानात बसण्यापूर्वी मी सहजच मागे वळून पाहिलं, तर "स्वा. विनायक दामोदर सावरकर हवाईअड्डा' ही अक्षरं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होती आणि जणू आम्हाला पुन्हा पुन्हा बोलवत होती.
"या तीर्थयात्रेला पुन्हा पुन्हा या... आपल्या इतिहासाचा आणि क्रांतिकारकांचा जयजयकार करण्याकरिता या...' हे वर्ष सावरकरांच्या आत्मार्पणाचं 50वे वर्ष आहे. या निमित्ताने इथे भरपूर कार्यक्रम होणार आहेत. त्याला उपस्थित राहण्याचं वचन मनोमन त्या सेल्युलर जेलला दिलं आणि विमानात पाऊल ठेवलं. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्यांची ब्लॉगर यादी

Goa

भूपतगड-प्राचीन पहारेकरी