जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे

जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे
मनोज हाडवळे

जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे 

पंचमहाभुतांची ताकद आपण कोण आजमावणार? पण त्यांची अनुभूती घ्यायची असेल, तर डॉ. कार्व्हरच्या भाषेत डॉ. जगदीशचंद्र बोसांच्या बोलीत निसर्गाशी तादात्म्य पावले पाहिजे. मग बघा निसर्ग कसे आपल्या मनातील अंतरंग खोलत जातो ते. डॉ. कार्व्हर, डॉ. बोस, डॉ. सालिम अली यांची वंशावळ मारुती चित्तमपल्लींपर्यंत पोचते. आणि गंमत म्हणजे त्याला पुढे खूप साऱ्या फांद्या फुटत जातात. जुन्नरच्या भूभागावर अकरा टक्के जंगल शिल्लक आहे, सह्याद्रीच्या आठवणी सांगत जुन्नरभर फैलावलेल्या वऱ्हाडी डोंगररांगा आहेत. हे डोंगर, त्यावरून वाहणारे प्रपात, डोंगराच्या उंचीला आव्हान देणारा सोसाट्याचा वारा, कातळाच्या रंगीबेरंगी खड्यांतून सजलेल्या मातीवर मेहंदी काढावी अशा हिरवाईने नटलेल्या देवराया सगळेच त्या पंचमहाभूतांची अनुभूती देणारे. आणि या सर्वांच्या आसऱ्याने गुण्यागोविंदाने नांदत इतिहास सांगणारे दुर्गवैभव, ध्यानस्थ लेणीवैभव, भक्तिरसात मग्न मंदिरे आणि सुफियाना अंदाजातून अध्यात्म सांगणारे दर्गे आपल्याला त्याच पंचमहाभूतांची वाट दाखवतात. मग काय, एक एक ठिकाण आश्‍चर्य म्हणून समोर येऊ लागते. जुन्नरमधून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-50 आणि मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग-222. हे दोन्ही महामार्ग आळेफाटा इथे एकमेकाला छेदून जातात, जुन्नरमधील पर्यटनवैभवाचा जेव्हा विचार होतो, तेव्हा पटकन तोंडात येणारी नावे म्हणजे शिवनेरी किल्ला, ओझर, लेण्याद्रीचे गणपती, नाणे घाट, माळशेज घाट इत्यादी; पण त्याही पलीकडे जाऊन पहिले तर जुन्नरमधे खूप काही आहे, जुन्नरच्या पश्‍चिम पट्ट्यातील निसर्गाच्या आणि पर्यटनस्थळांच्या प्रेमात तर सगळेच असतात; पण पूर्व पट्ट्यातील पठारावरही खूप वेगळेपण असणारी पर्यटनस्थळे आहेत, ज्याने आपली पाऊले नक्कीच तिकडे वळतील यात शंका नाही.

आळेफाट्यापासून पूर्वेकडे निघालो, की किलोमीटरभर अंतरावर आहे आळे गाव. ज्ञानेश्वरांच्या वेदप्रणित म्हैसोबाचे समाधी मंदिर. आळे गाव सोडले, की उजवीकडे 6 किमी असणारे बोरी गाव आणि बोरीतील लाखो वर्षे जुनी, कुकडी नदीच्या पात्रातील टेफ्रा, असेच महामार्गाने पुढे जात राहिलो, की आळेफाट्याहून 12 किमी अंतरावर आहे, ऐतिहासिक बेल्हे गाव. जिथे नवाब ऑफ बेल्हाची गढी आहे, एक प्राचीन पुष्करणी आहे, 300 वर्षांची परंपरा असलेला सोमवारचा वैशिष्ट्यपूर्ण आठवडी बाजार आहे आणि अस्सल चुलीवरची मटण -भाकरी अशी रविवार- सोमवारची जिभेची चव जपणारी खाद्यसंस्कृती आहे. बेल्हे गावाजवळच जीएमआरटी या जगातील सर्वांत मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या अँटेना आहेत. बेल्हे गावातून असेच महामार्गाने नगरच्या दिशेला निघालो, की साधारण 5 किमीवर नागमोडी आणेघाटाची वाट आहे, जिथे भारतातील सर्वांत मोठा शिलासेतू आहे. घाट चढून पुढे गेलो, की आणे पठार लागते आणि आण्याच्या पुढे साधारण 6-7 किमीवर पुणे आणि नगरची भेट होते, त्याच महामार्गाने पुढे 17 किमीवर टाकळी ढोकेश्वर गाव लागते, जिथे जवळच ऐतिहासिक पळशी गाव आणि ढोक लेणीसुद्धा आपण पाहू शकतो. आळेफाटा परिसरात कृषी आणि ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवासाठी कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्रेही आहेत. थोडक्‍यात काय तर जास्त चढ-उतार करायची नसेल आणि एकाच वेळी ग्रामीण, धार्मिक, नैसर्गिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर आळेफाट्याच्या परिसरात आरामशीर फिरता येईल.

वेदप्रणीत म्हैसोबा समाधी मंदिर, आळे
संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्याला कलाटणी देणारा पैठणमधील विद्वान सभेतील तो प्रसंग त्या मुक्‍या प्राण्याच्या मुखातून अजरामर झाला. म्हैसोबाने वेद बोलल्यानंतर, नेवासामार्गे ज्ञानेश्वर आणि भावंडे अलंकापुरीकडे निघाली होती. अर्थात सोबत म्हैसोबा पण होतेच. मजल दरमजल करत, डोंगरदऱ्या पार करत, मोठी चाल करून आल्यानंतर म्हैसोबा थकले, खूप सारे डोंगरमाथे चढून आल्यावर, झाडाच्या आळ्याच्या आकाराचा डोंगर आणि समोर विस्तीर्ण सपाट भूभाग बघून म्हैसोबा तिथेच समाधिस्थ झाले, अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते. आळेफाट्यापासून नगरकडे निघालो, की एक किमीच्या अंतरावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला वेदप्रणीत म्हैसोबा समाधी मंदिराचे प्रवेशद्वार आपले स्वागत करते, तीन-चार किमी अंतरावर छोटेखानी तीर्थक्षेत्र आपल्याला ग्यानबा तुकारामच्या वैष्णव परंपरेत घेऊन जाते. चैत्र एकादशीला तीन दिवसांची छान यात्रा भरते, जिथे अनेक ग्रामीण वस्तूंची रेलचेल असते. 1863 मध्ये बांधलेल्या या मंदिरात अहोरात्र वीणा पहारा सुरू असतो.

बोरी गावची टेफ्रा
आळे गावाच्या उजवीकडे साधारण सहा किमी अंतरावर बोरी गाव लागते, बोरी गाव तसे ऐतिहासिक आणि प्राचीन व्यापारी मार्गावरील गाव आहे. कुकडी नदीच्या काठावर वसलेल्या या गावात, नदीच्या पात्रात एक चमत्कार पाहावयास मिळतो. संशोधकांच्या मते, टेफ्रा या राख स्वरूपातील थरांमध्ये अल्युशियन काळातील वैशिष्ट्यपूर्ण दगडी हत्यारांचा शोध लागला आहे. गुजरातमधील राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेत अभ्यास केला असता ही टेफ्रा चौदा लाख वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध झाले आहे (संदर्भ-सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या-प्र के घाणेकर) इतके प्राचीन वैभव या बोरी गावात आहे, याची कल्पना अजून स्थानिक नागरिकांना होत नाही, वाळू उपशाच्या उद्योगातही टेफ्रासुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाच्या या अनमोल ठेव्याला जतनाची गरज आहे, पर्यटकांची ये- जा वाढली तर लोकांना त्याचे महत्त्व पटेल.

ऐतिहासिक बेल्हे गाव आणि बांगरवाडीचा गुप्त विठोबा
आळेफाट्यापासून साधारण बारा किमी अंतरावर, महामार्गावरच असलेले हे ऐतिहासिक बेल्हे गाव. आताच्या बेल्हे गावाच्या ईशान्येच्या कोपऱ्यात सुंदर अशी पुष्करणी शेवटचे श्वास मोजत आहे. जुन्नरच्या नवाबाची वाटणी होऊन बेल्ह्याला निर्माण झालेला सवता सुभा, नवाब ऑफ बेल्हा बनला. आजूबाजूच्या वाड्या- वस्त्या जोडलेल्या असल्यामुळे आणि नवाबाचे गाव असल्यामुळे बेल्हे गावाला मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप फार पूर्वीपासून होते. म्हणूनच दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार आजही डोळ्याचे पारणे फेडतो. हा आठवडी बाजार बैलबाजारासाठी फार प्रसिद्ध आहे, बाजाराला येणाऱ्या लोकांच्या खानपानाची व्यवस्था करायला सुरू झालेले तंबू, आता जुन्नरच्या खाद्य संस्कृतीचे प्रतीक बनले आहेत. चुलीवरची भाकरी, मासवडी, मटण/चिकन याची चव चाखायला पुण्या-मुंबईचे खवय्ये इथे जातीने हजेरी लावत असतात. बेल्हे गावातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवाबाची गढी. 1929 मध्ये उभारलेली ही गढी त्या वेळची श्रीमंती दाखवत आहे; पण सध्या ती बघण्यासाठी उपलब्ध नाही. बेल्हे गावाजवळच तीन-चार किमी अंतरावर बांगरवाडी नावाचे डोंगरांच्यामध्ये लपलेले छोटेखानी गाव आहे. या सुंदर गावात, डोंगराच्या पोटाला आणि निसर्गाच्या कुशीत विठ्ठलाचे मंदिर आहे. मंदिर जरी पूर्वमुखी असले तरी प्रवेश मात्र पश्‍चिमेकडून - पायऱ्या उतरून खाली जावे लागते. एक खांबी दगडी गुहेतील या मंदिरात विठ्ठलाची ध्यानस्थ मुद्रा क्षणभर आपल्यालाही मंत्रमुग्ध करते. पावसाळ्यात डोंगरपठारावरील हिरवाई त्यात अजूनच नवचैतन्य भरते.

जीएमआरटी, खोडद
खोडद गाव तसे नारायणगावजवळून नऊ किमी अंतरावर; पण मधल्या मार्गे, बोरी गावाहून सात-आठ किलोमीटरवर आहे. जीएमआरटी ही जागतिक दर्जाची रेडिओ दुर्बीण जुन्नरमध्ये पसरलेली आहे. मुख्यालय जरी खोडद गावी असले, तरी एकूण तीस अँटेना इंग्रजी वाय(Y) या आकारात मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटर परिसरात पसरलेल्या आहेत. त्यापैकी मुख्यायात बारा आणि वाय(Y)च्या प्रत्येक रेषेवर सहा अशाप्रकारे विखुरलेल्या आहेत. त्यातील दोन इथे बेल्हे गावाजवळ आहेत. शक्‍य झाले तर खोडदला भेट द्या (शुक्रवार व्हिजिटिंग डे असतो, अर्थात पूर्व परवानगीनेच) किंवा रस्त्याने जाताना दिसणाऱ्या एखाद्या अँटेनाजवळ जाऊन बघा. जाण्याआधी थोडे वाचले असेल, तर समजण्यास सोपे जाते किंवा मग एखादा माहीतगार सोबत घ्यावा.
बेल्हे गावाच्या परिसरात असणारी इतर पर्यटनस्थळे म्हणजे दर्याबाई पाडळीचे लवणस्तंभ, कोरथन गावचा डोंगरमाथ्यावरील खंडोबा आणि नाळावणे गावाच्या पठारावरील खंडोबा. ही पर्यटनस्थळे आपापले वेगळेपण टिकवून आहेत.

आणे घाटातील नैसर्गिक पूल
आळेफाट्यावरून कल्याण-नगर या 222 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाने नगरकडे जात असताना, साधारण बारा किलोमीटर अंतरावर नागमोड्या वळणाचा आणे घाट लागतो. दोन-तीन वळणानंतर, उजवीकडे गणपतीचे मंदिर दिसते आणि त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला मळगंगा देवी मंदिराकडे जाणारी छोटेखानी महिरप आपले स्वागत करते. तिथे बाजूलाच आपले वाहन लावावे आणि पाच-सात मिनिटांची पायऱ्यांची सोपी उतरण चालायला तयार व्हावे. दोन डोंगरांच्यामधील खिंडीत उतरत, अदृश्‍य होणारी पायऱ्यांची वाट तशी सोपीच आहे. ज्यांना खाली उतरून जाणे शक्‍य नाही, त्यांनी महामार्गाने तसेच पुढे जाऊन वरूनच नैसर्गिक पूल पाहता येतो. शंभर-सव्वाशे पायऱ्या उतरून जात असताना, आजूबाजूच्या गिरीपुष्पाच्या थोड्याफार जंगलातून उतरत जाणारी पायरीवाट आपल्याला खाली खिंडीत घेऊन जाते आणि समोर दिसते ते या निसर्गाचे राजवैभव. आजूबाजूच्या डोंगरमाथ्याच्या पठारावरील पावसाचे पाणी उताराने वाहत खाली यायचे, त्याचा मोठा प्रपात बनायचा; पण डोंगराची एक खाली उतरत आलेली नाळ पाण्याच्या प्रवाहाची वाट अडवायची. इथे दोन पंचमहाभूतांची एकमेकांना आव्हाने असायची, कारण अग्निजन्य खडक. त्यामुळे पोलादी ताकद आणि पाण्याचा वेग म्हणजे दुधारी तलवार, अजस्र डोंगर पाण्याला अडवतोय की बेभान पाणी डोंगराला फोडतेय या धुमश्‍चक्रीत अखेर विजय पाण्याचा झाला आणि खडकाला फोडून पाण्याने आपली वाट बनवली. हे घडायला सुरवात झाली असेल काही हजारो वर्षांपूर्वी. कारण पाण्याला वाट तर मिळाली होती; पण त्याला सहजासहजी वाहू देईल तो पर्वत कसला? छोट्याशा सापटीतून वाहणारी धार हळूहळू कातळ कापू लागली आणि हजारो वर्षांच्या प्रक्रियेतून आज नऊ मीटर उंचीचा आणि बावीस मीटर लांबीचा शिलासेतू बनला आहे. अग्निजन्य खडकात पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने बनलेला या आकाराचा भारतातील एकमेव शिलासेतू असावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पावसाच्या पाण्याचेच हे काम असल्यामुळे त्या वेळी इथे होणाऱ्या आवाजाची, फुत्काराची भीती आसमंतात गुंजत असेल. कदाचित म्हणूनच मानवाने स्वतःची भीती घालवायला त्या ठिकाणी मळगंगा देवीचे स्थान बनविले असावे. आजमितीला एक छानसे मंदिर त्याठिकाणी उभे आहे. खूप सारे भाविक भक्त तिथे दर्शनाला जात आहेत; भारतातील सर्वांत मोठा शिलासेतू आपले स्वागत करायला तेवढाच उत्सुक असलेला दिसतो.
आपण जुन्नरच्या पूर्व भागात आवर्जून फिरावे; पण कुठलाही कचरा न करता एक जबाबदार पर्यटक म्हणून. जुन्नरची खासियत म्हणजे पश्‍चिम आणि पूर्व या दोन्ही भागांतील निसर्ग, वातावरण हे पूर्णपणे वेगळे आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Goa

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती

माझे ग्रंथालय ग्रंथ तुमच्या दारी