अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती
अाशुतोष बापट

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती

निसर्गसमृद्ध असा आपला महाराष्ट्र अनेक विविधतांनी नटलेला आहे. किल्ले-लेणी-मंदिरे ही तर इथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतातच, पण त्याचसोबत कला-रूढी-परंपरा-देवता यांचीसुद्धा इथे रेलचेल आहे. शिव, देवी, गणपती ही इथली आराध्य दैवते. गणपती तर सर्वांत लोकप्रिय अशी देवता. घराघरात पूजला जाणारा हा देव आपल्याला भटकंतीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या रूपात भेटतो. कधी तो डोंगरावर आहे, तर कधी थेट समुद्रातल्या किल्ल्यात. कधी तो स्त्रीरूपात आहे, तर कधी तो चक्क झोपलेल्या स्थितीत आहे. गणेशाची ही वैशिष्ट्यपूर्ण रूपे जरा आडवाटेला गेले तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्याच त्याच गर्दीच्या ठिकाणी रेटारेटीत हा देव नाही भेटत. तो एकांतात भक्तांची वाट पाहत उभा आहे. भक्तांना साद घालतो आहे. गरज आहे त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याला भेटायची. असेच काही आगळेवेगळे गणपती पाहायला बाहेर पडूयात.

स्त्रीरूपातील गणेश - भुलेश्‍वर
पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीची भुलेश्‍वर रांग. शिवकाळात इथे मुरार जगदेवांच्या काळात दौलतमंगळ नावाचा एक किल्ला उभारला होता. भुलेश्‍वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळे त्याला म्हणू लागले दौलतमंगळ. या किल्ल्याचे फारसे अवशेष आता शिल्लक नाहीत, पण इथे असलेलं अप्रतिम शिवमंदिर मात्र आवर्जून जाऊन पाहण्याजोगे आहे. इथेपर्यंत येण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता बांधलेला आहे. यादव काळात बांधले गेलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून शिल्पसमृद्ध आहे. वादक, नर्तकी, हत्ती, घोडे, सूरसुंदरी या शिल्पांसोबतच अनेक देवदेवतांच्या शिल्पांचेसुद्धा या मंदिरावर अंकन केलेले आढळते. या सर्व शिल्पाकृतींमध्ये स्त्रीरूपातील गणपतीची प्रतिमा आपल्याला खिळवून ठेवते. हा काय प्रकार आहे? गणपती असा स्त्रीरूपात का दाखवला असेल? शिल्पकाराची ही चूक तर नाही ना झाली असे प्रश्‍न मनात येणं अगदी साहजिक आहे. पण ही चूक वगैरे काही नाहीये. प्रत्येक देवतेची शक्ती ही जर मूर्तीरूपात दाखवायची असेल तर ती स्त्रीरूपात दाखवतात. सप्तमातृका हे पण त्याचेच प्रतीक आहे. अंधकासुर वधाच्या वेळी शिवाने मदतीसाठी देवांना त्यांच्या शक्ती मागितल्या. देवांनी त्या शक्ती युद्धात मदत करण्यासाठी शिवाला दिल्या होत्या. त्यांचे शिल्पांकन करताना स्त्री प्रतिमा दाखवून त्या त्या संबंधित देवाची वाहने त्या प्रतिमांच्या खाली दाखवतात. अन्वा या गावी तर विष्णूच्या चोवीस शक्तींच्या अप्रतिम स्त्री प्रतिमा केदारेश्‍वर मंदिरावर कोरलेल्या आहेत. साहित्यामध्ये शक्ती हे स्त्रीलिंगी रूप आपण वापरू शकतो; परंतु मूर्ती घडविताना शक्ती हे स्त्रीरूपात दाखवतात. विनायकाची शक्ती म्हणून ती विनायकी असे नामकरण केलेलं आहे. वैनायकी-लंबोदरी-गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी ही गणपतीच्या शक्तीची प्रतिमा असते. इथे भुलेश्‍वरला प्रदक्षिणा मार्गावर वरती वैनायाकीची देखणी प्रतिमा आहे. त्याच्या खाली उंदीरसुद्धा दाखवला आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई देवीच्या मंदिरात कळसातील एका कोनाड्यात अशीच एक गणेशाची मूर्ती आहे. इथे चेहरा गणपतीचा आणि अंगावर साडीचे वस्त्र दाखवलेले आहे. तसेच कपाळावर स्त्रिया लावतात तसेच कुंकू लावलेले आहे. सोळा हातांची ही प्रतिमासुद्धा सुरेख दिसते. भुलेश्‍वरला ही आगळीवेगळी वैनायकी पाहण्यासाठी मुद्दाम गेले पाहिजे.

झोपलेला गणपती - आव्हाणे
निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार इथे पाहायला मिळतात. पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. नगर जिल्ह्यातील तिसगावपासून अंदाजे 15 कि.मी. अंतरावर आहे आव्हाणे हे गाव. गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहात होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरया गोसावींचा दृष्टांत झाला की आता त्यांनी वारी करू नये. तरीसुद्धा निस्सीम गणेशभक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले. वाटेत असलेल्या ओढ्याला मोठा पूर आला होता. मोरयाचे नाव घेऊन दादोबा त्या ओढ्यात उतरले खरे, पण पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर लांब वाहात गेले. वाटेत असलेल्या एका बेटावर ते थांबले असता, तेव्हा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला की मीच तुझ्या गावी येतो. कालांतराने दादोबा देव यांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय एक स्वयंभू गणेशाची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांच्या मुलाला, गणोबा देव याला दृष्टांत झाला की ती मूर्ती आहे तशीच असू देत, त्याच अवस्थेत तिची पूजा कर. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली फुटावर स्वयंभू गणेश मूर्ती आहे. गर्भगृहात एका कोनाड्यात ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्या दादोबा देव आणि त्यांचा मुलगा गणोबा देव यांच्याच आहेत असे सांगितले जाते. पूजेतली मूर्ती मात्र फक्त हीच निद्रिस्त गणेशाची. संकष्टी, अंगारकी आणि माघी गणेश उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी भिंतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. सुंदर असा सभामंडप नुकताच बांधून घेतलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. निद्रिस्त गणेशाचे हे आगळे-वेगळे आणि महाराष्ट्रातील बहुदा एकमेव मंदिर मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे.

कुलाबा किल्ल्यातील गणेश
स्वराज्याच्या पश्‍चिम सीमेच्या रक्षणासाठी सुसज्ज आरमार आणि बलदंड जलदुर्गांची गरज आहे हे ओळखणारा पहिला राजा म्हणून शिवाजी महाराजांची नोंद घेतली गेली आहे. अलिबाग जवळच्या नवघर या खडकाळ बेटावर जलदुर्ग बांधायचा संकल्प शिवरायांनी केला. कुल म्हणजे सर्व आणि आप म्हणजे पाणी. ज्या बेटावरील किल्ल्याला सर्व बाजूंनी पाण्याचा वेढा आहे, तो कुलाबा! शिवरायांनंतर पुढे प्रचंड मेहनत, आणि अत्यंत बेरकी पण आणि बेधडक वृत्ती या गुणांमुळे कान्होजी आंग्रे पश्‍चिम किनाऱ्यावरचे सर्वेसर्वा बनले. त्यांनी याच कुलाबा किल्ल्याच्या साथीने मराठ्यांच्या आरमाराची ("आर्माडा' म्हणजे नौदल, या इंग्लिश शब्दाचा हा अपभ्रंश आहे) ताकद सिंधुसागरावर निर्माण केली. या किल्ल्यामध्ये चक्क गणेश पंचायतन आहे. या पंचायतनाचे आवार चांगले प्रशस्त आहे. आवारात पूर्वाभिमुख तीन मंदिरे आहेत. या मंदिरसमूहासमोर गोड्या पाण्याचा एक मोठा तलाव दिसतो. सन 1759 मधे राघोजी आंग्रे यांनी 45 से.मी. उंचीची संगमरवराची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती या मंदिरात स्थापित केली. गणेशाच्या उजव्या बाजूला एक चतुर्भुज शिवमूर्तीसुद्धा आहे. तर मागच्या बाजूला चतुर्भुज सूर्याची प्रतिमा दिसते. गणेशाच्या डाव्या बाजूला मागे महिषासुरमर्दिनी तर पुढे त्रिविक्रम विष्णूची मूर्ती आहे. सिद्धिविनायकाच्या हातात अक्षमाला, कमल, परळ आणि मोदक दिसतात. गणेश मंदिराच्या पायऱ्या उतरून बाहेर आले की उजव्या हातास सुंदर असे तुळशीवृंदावन आहे.
अलिबाग/श्रीबागला अनेकदा जाणे होते, परंतु हा किल्ला तर पाहण्याजोगा आहेच, पण त्याबरोबर आतील गणेशाचेसुद्धा दर्शन जरूर घ्यावे. इथे जाण्यासाठी भरती-ओहोटीच्या वेळा पाळून मगच किल्ल्यात जाता येते. ज्या दिवशी आपण जाणार त्या दिवसाच्या तिथीची पाउणपट म्हणजे त्या दिवशीची पूर्ण भरतीची वेळ असते. त्यात सहा मिळवले किंवा वजा केले की पूर्ण ओहोटीची वेळ येते. मग या वेळी किल्ल्यात आपल्याला जाता येते. भरती येऊ लागली की हा जाण्या-येण्याचा मार्ग पाण्याखाली जातो. तरीसुद्धा स्थानिकांना विचारूनच किल्ल्यात जावे. इथेच नव्हे तर कोणत्याही समुदकिनारी तिथल्या स्थानिक मंडळींशी चर्चा करूनच पाण्याजवळ जावे म्हणजे आपली भटकंती निर्धोक होते.

त्रिमुखी गणेश - बुरोंडी
बुरोंडी या दापोलीपासून फक्त 12 कि.मी.वर असलेल्या गावातली ही एक अद्‌भुत गोष्ट आहे. या गावात कोळी आणि खारबी समाजाचे मासेमारी हा व्यवसाय करणारे लोक आहेत. या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या "एकवीरा' नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हर्णैच्या जवळ खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही एक लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. उत्सुकतेने त्यांनी ती काय आहे म्हणून बघितले तर श्रीगणेशाची एक लाकडाची मूर्ती होती. कोणीतरी ती विसर्जित केली असावी, असे समजून या दोघांनी नमस्कार करून मूर्ती परत समुद्रात सोडून दिली. काही वेळाने अजून आत समुद्रात गेल्यावर त्यांना तीच मूर्ती परत बोटीजवळ आलेली दिसली. त्यांनी परत ती सोडून दिली. बरेच अंतर समुद्रात गेल्यावर त्यांना पुन्हा तीच मूर्ती त्यांच्या होडीच्या जवळ आलेली दिसली. आता मात्र ते चक्रावून गेले. हा काहीतरी चमत्कार असावा आणि गजाननाला आपल्याकडे यायचे असावे असे समजून त्यांनी ती मूर्ती परत किनाऱ्यावर आणली. सगळा प्रसंग गावातल्या मंडळींना सांगितला. सगळ्या ग्रामस्थांनी एकमताने असे ठरवले की या गणेशमूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचे. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते, मग शेवटी या मंडळींनी गावातल्याच श्रीसावरदेवाच्या मंदिरात, माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून त्या गावाला आणि साखरकर कुटुंबीयांना भरभराटीचे दिवस आले, असे लोक सांगतात.
चार फूट उंचीची शिसवीच्या लाकडाची ही मूर्ती तीन तोंडांची आहे. तुंदिलतनू आणि विविध अलंकारांनी मढवलेली ही गणेश मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्तीला सहा हात असून पाश, दंत अशी आयुधे तिच्या हातात आहेत. मूर्तीची अलंकारांची कलाकुसर अतिशय अप्रतिम आहे. गणेशाच्या पायाशी त्याचे वाहन मूषक आणि बाजूला बीजपूरक दिसते. सुफलता आणि नवनिर्मिती याचे ते प्रतीक असलेले हे फळ लाडवासारखे दिसते. दापोली दाभोळ या परिसरात कायम लोकांचे जाणे होते. परंतु या गणेशाचे दर्शन आता मुद्दाम जाऊन घेतले पाहिजे. जवळच असलेला रम्य सागरकिनारा या मंदिराला आणि परिसराला अजूनच शोभा देतो.

मापगावचा श्रीराम सिद्धिविनायक
अलिबागपासून अगदी जवळ 2000 फूट उंचीवरील डोंगरावर कनकेश्वर वसले आहे. काहीसे वेगळे, चढून जाण्यासाठी सुलभ, आणि माथ्यावरून दिसणारे दृश्‍य केवळ अप्रतिम असे हे ठिकाण आहे. आज्ञापत्र या प्रख्यात ग्रंथात शिवराजनीती सांगणारे रामचंद्रपंत अमात्य हे पुढे शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षात कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मनस्थितीत सापडले. शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते. कनकेश्वर हे खरे तर शंकराचे स्वयंभू स्थान आहे. परंतु इथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. अलिबागपासून फक्त दहा कि.मी.वर मापगाव नावाचे गाव लागते. मापगावपासून अंदाजे 800 दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. इथे असलेल्या एका पुष्करणीच्या उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्‍चिमाभिमुख मंदिर वसले आहे. हे मंदिर कऱ्हाड येथील गणेशशास्त्री जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र याने ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके 1798 रोजी बांधले. या रामचंद्रनेच पुढे स्वामी लंबोदरानंद असे नाव धारण केले. याच परशुरामभक्त श्री लंबोदरानंद स्वामी यांना भगवान परशुरामाने तपश्‍चर्येसाठी श्री लक्ष्मी गणेशाची लहान आणि देखणी मूर्ती दिली आणि त्यांना कनकेश्वर इथे जाऊन तपश्‍चर्या करावयास सांगितले. पुढे स्वामींनी समाधी घेतल्यावर त्यांचे एक स्नेही बापट यांनी स्वामींच्या समाधी शेजारीच हे गणेशमंदिर बांधले. परंतु या गणेशाची पूजा करू नये, असा परशुरामाचा आदेश असल्यामुळे त्यांनी वडोदरा येथील गोपाळराव मैराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना केली. परशुरामाने लंबोदरस्वामींना दिलेली मूर्ती तांब्याच्या पेटीत बंद करून ठेवली आहे आणि तिची एक प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. पूजेची गणेशप्रतिमा जवळजवळ तीन फूट उंच असून संगमरवरी आहे. गणेशाच्या मूर्तीशेजारीच रिद्धी-सिद्धीच्या यांच्या मूर्तीसुद्धा आहेत. असे हे निसर्गरम्य गिरीस्थान-कनकेश्वर अलिबाग भेटीच्या वेळी न चुकता पाहावे.

मोरयाचा धोंडा - मालवण
छत्रपती शिवाजीराजांचे स्वराज्य आता पश्‍चिमेला सिंधूसागरापर्यंत विस्तारले. कोकणचा कारभार करायचा तर समुद्रावर स्वामित्व हवंच. सुसज्ज आरमार आणि त्याच्या मदतीला तेवढेच बेलाग जलदुर्ग यांचे महत्त्व या राजाने केव्हाच ओळखले होते. मालवण इथे आले असता त्यांच्या मनात समुद्रातील एक बेट भरले. कुरटे बेट. शुद्ध खडक, स्थल उत्तम, गोड्या पाण्याचाही ठाव आहे, ऐसे पाहून राजियांनी आज्ञा केली- या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा. त्यांनी इथे सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम सुरू करायचे ठरवले. स्थानिक प्रजेला अभय दिले. वेदमूर्तींना विश्वास दिला आणि महाराज पूजेला बसले. तो दिवस होता 25 नोव्हेंबर 1664. कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा अर्थातच गणपतीच्या पूजनानेच व्हायला हवा. मालवणच्या किनाऱ्यावर होता का गणपती? हो. होता ना. जिथे महाराज पूजेला बसले त्याच जागी आहे एक मोठा खडक. याला म्हणतात मोरयाचा धोंडा. मालवण किनाऱ्यावर वायरी भूतनाथाच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाईट बनलेला जांभळ्या रंगाचा हा खडक आहे. त्यावर विघ्नहर्ता गणेश, चंद्र, सूर्य, शिवलिंग, नंदी आणि पादुका कोरलेल्या आहेत. यावर कोरलेल्या गणेशमूर्तीमुळे याचे नाव झाले मोरयाचा धोंडा. या मोरयाची साग्रसंगीत पूजा करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास सुरवात केली. शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे स्थळ सध्या मात्र उघड्यावर निसर्गाच्या सर्व ऋतूंचा मारा सहन करत उभे आहे. मालवणला गेल्यावर किनाऱ्यावर जाऊन या मोरयाला नक्की वंदन करावे. इथून सिंधुदुर्ग किल्ला फार सुरेख दिसतो. मालवणला पोलिस ठाण्याजवळ राजकर्णक महाराजांची समाधी मुद्दाम पाहावी. कर्णक नावाचे एक संन्यस्त व्यक्ती कुरटे बेटावर वास्तव्य करून होते. शिवरायांनी याच कुरटे बेटावर बलाढ्य किल्ला बांधायचे ठरवले. किल्ल्यामुळे कर्णक महाराजांच्या साधनेत व्यत्यय येईल म्हणून त्यांना कुरटे बेताऐवजी मालवण गावाजवळ शांत परिसरात राहण्याची विनंती शिवरायांनी केली. तेव्हा राजांच्या कानात त्यांनी काही मोलाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हापासून त्यांना "राजकर्णक' म्हणू लागले. मेढा भागात त्यांचे वास्तव्य होते. तिथेच त्यांनी संजीवन समाधी घेतली. आता इथे एक छोटी घुमटी आणि आत एक शिवलिंग आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Goa

कोरीगड किल्ला