जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे मनोज हाडवळे जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे पंचमहाभुतांची ताकद आपण कोण आजमावणार? पण त्यांची अनुभूती घ्यायची असेल, तर डॉ. कार्व्हरच्या भाषेत डॉ. जगदीशचंद्र बोसांच्या बोलीत निसर्गाशी तादात्म्य पावले पाहिजे. मग बघा निसर्ग कसे आपल्या मनातील अंतरंग खोलत जातो ते. डॉ. कार्व्हर, डॉ. बोस, डॉ. सालिम अली यांची वंशावळ मारुती चित्तमपल्लींपर्यंत पोचते. आणि गंमत म्हणजे त्याला पुढे खूप साऱ्या फांद्या फुटत जातात. जुन्नरच्या भूभागावर अकरा टक्के जंगल शिल्लक आहे, सह्याद्रीच्या आठवणी सांगत जुन्नरभर फैलावलेल्या वऱ्हाडी डोंगररांगा आहेत. हे डोंगर, त्यावरून वाहणारे प्रपात, डोंगराच्या उंचीला आव्हान देणारा सोसाट्याचा वारा, कातळाच्या रंगीबेरंगी खड्यांतून सजलेल्या मातीवर मेहंदी काढावी अशा हिरवाईने नटलेल्या देवराया सगळेच त्या पंचमहाभूतांची अनुभूती देणारे. आणि या सर्वांच्या आसऱ्याने गुण्यागोविंदाने नांदत इतिहास सांगणारे दुर्गवैभव, ध्यानस्थ लेणीवैभव, भक्तिरसात मग्न मंदिरे आणि सुफियाना अंदाजातून अध्यात्म सांगणारे दर्गे आपल्याला त्याच पंचमहाभूतांची वाट दाखवतात. मग काय, एक एक ठिक