Goa

GOA DIARIES

आता लॉकडाऊन मधे बराच वेळ आहे म्हणुन जुणे पिकनिकचे फोटो बघत होतो. गोव्याचे जुणे फोटो बघुन गोव्याच्या सर्व पिकनिक नजरेसमोरुन गेल्या. फोटो बघुन तिकडे जाण्याची फारच इच्छा होत आहे. आता लगेच तर तिकडे जावु शकत नाही. म्हणुन हे गोवा ईबुक लिहायला घेतले. आणि तुम्हाला ही खुप वेळानंतर भेटण्याची संधी.  
गोवा म्हणजेच गोमंतक हे तर पर्यटकांचे नंदनवन! लहानांपासुन मोठ्यापर्यत, देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालणारे ठिकाण म्हणजे गो-गो-गोवा. हिमालयाचे वेड असणारे जसे पर्यटक असतात तसेच समुद्रकिनांर्याचे वेड असणार्या पर्यटकांचा मोठा वर्ग आहे. आणि ह्या गोव्याची खासियत म्हणजे येथे सर्व प्रकारचे पर्यटन आहे. गोव्यात मंदिरे, चर्च, किल्ले, सागरकिनारे,साहसी पर्यटन, टेकड्या, धबधबे, लेण्या, अभयारण्य, संग्राहलये, नाईट्लाइफ सर्व सर्व आहे. प्रत्येक पर्यटकाची हौस भागवणारी ठिकाणे येथे आहेत. म्हणुनच गोवा हे माझे सर्वात जास्त आवडते ठिकाण आहे. शिवाय येथिल सर्व ठिकाणे जवळजवळ आहेत. गोव्यामध्ये कदाचित मौजमस्ती ही सर्वात मोफत गोष्ट आपण करू शकता! मग आपण कुठे असता किंवा काय करता याला महत्त्व नाही, गोव्यामध्ये असताना मौजमस्ती करणे ही वृत्तीच असते.
त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा आपण बजेटमध्ये सुट्टीचे ठिकाण बघत असाल, तेव्हा गोव्यामध्ये भन्नाट सुट्टी साजरी करण्यासाठी आपल्याला फार काही खर्च करावा लागणार नाही गोवा मध्ये जाण्यासाठी अगदी ५ हजांरापासुन ते ५ लाखांचे बजेट असणारे सर्वजण जावु शकतात. अश्या ह्या गोव्यात १२ महिने पर्यटकांची वर्दळ असते. समुद्रकिनारा असल्याने नोव्हेंबर ते मार्च हा काळ तेथे जाण्यासाठी योग्य आहे. मी बर्याच वेळा वेगवेगळ्या काळात तिथे गेली आहे. प्रत्येक वेळेस गोवा वेगवेगळ्या नजरेने भेटतो. गोवा हे करोनावायरसमुक्त झालेले पहिले राज्य आहे. आता जाणुन घेवुया थोडेसे गोव्याबद्द्ल.

गोव्याचा इतिहास
गोव्याचा मुक्तिसंग्राम तर फार मोठा आहे. १४९८ ला पोर्तुगीज खलाशी 'वास्को द गामा' याने गोव्यात पाऊल टाकले. भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली.  भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण गोवा मात्र पारतंत्र्यात राहिला. गोवा मुक्त होण्यासाठी जवळ जवळ चौदा वर्षं गेली. गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी १९ डिसेंबर १९६१ हा दिवस उजाडावा लागला. 

कोकण रेल्वे झाल्यापासुन गोव्याला जाणे सोपे झाले आहे. मुंबईवरुन गोव्याला जाताना मला पहिल्यावेळेस तिकीट काढताना कळाले की गोवा नावाचे रेल्वे स्टेशन नाही. आपण एकतर थिविम किंवा मडगाव स्टेशनला उतरु शकतो. गोव्याला जाण्यासाठी थिविमला उतरुन म्हापसाला जावु शकतो. थिविम स्टेशनला उतरल्यावर बाहेरच टॅक्सी  स्टॅण्ड आहे. तसेच थोडेसे पुढे चालत गेल्यावर बाहेर बसस्थानक आहे. तिथे दोडामार्ग-म्हापसा ही बससेवा सतत सुरु असते. 
गोव्यात फिरण्याचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे बाईक भाड्यावर घेऊन फिरणे ही गोव्यातील सर्वात प्रसिद्ध गोष्ट आहे. बाईकचे अनेक प्रकार आपल्याला ३०० ते ५०० रुपये नाममात्र भाड्यात मिळू शकतात. पेट्रोल आपल्याला भरावे लागते. अनेक हॉटेल वाले रूम सर्विस सोबत बाईकची पण सोय करतात. ते आपल्याला त्या सोबत हेलमेट देखिल पुरवतात. त्यासाठी आपल्याला आपल्याकडे ड्रायविंग लायसन्स हवे. आपले ओरिजनल आय डी कार्ड त्यांच्याकडे जमा करावे लागते. बाईक घेऊन गोव्याच्या गल्ली गल्लीत फिरण्याची मजा काही औरच आहे. गोवा फिरण्यासाठी ३ दिवसांपासुन ते ३० दिवसापर्यन्त करण्यासारख्या गोष्टी आहेत. प्रश्न फक्त सुट्टीचा आणि बजेटचा आहे. तुम्ही एकाच बीचवर जरी रोज गेले तरी तुम्हाला कंटाळवाणे वाटणार नाही. तेथे मोठ्या आवाजात लावलेले म्युझिक, लोकांची हालचाल, तुम्हाला बोअर होऊन देणार नाही. आणि ह्या ठिकाणांना अनेक वेळा भेट दिली तरी कमीच वाटेल. कधी खादयसंस्कृती, कधी नाईट्लाईफ,बीचेस, मस्ती हे सर्व कमीच पडणार आहे. तर असा हा गोवा पुढच्या वेळी नक्की तुमच्या फिरण्याच्या यादीत समावेश करा. सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे गोवा ट्रिपला जाताना मस्तीचा मूड हवा. ट्रिपसाठी जात असल्याने कोणत्याही प्रकारचे गांभीर्य, टेंशन्स अगदी तुमच्या लुकमध्येसुद्धा दिसता कामा नये. मस्त गोव्याच्या वातावरणात आणि तुम्हाला सुट होतील अशी ट्रेंडी कपडे, चंकी ज्वेलरी, सनक्रीम आणि मॉइश्चराइझर सोबत घ्या. वेगवेळ्य़ा प्रकारचे गॉगल्स,कॅप्स तेथे सर्वत्र मिळतात. तुमच्या आवडीचा गॉगल,कॅप खरेदी करा. आणि मस्तीसाठी तयार व्हा.
गोव्याचे पर्यटनाच्या दृष्टीने  दोन विभाग करण्यात आले आहेत. उत्तर गोवा व द्क्षिण गोवा.
उत्तर गोवा
उत्तर गोव्याची ट्रिप करताना सर्वात अगोदर आम्ही कोको बीचला डॉल्फिन सफारीला गेलो होतो. सकाळी सकाळी गेल्यास डॉल्फिन दिसण्याची शक्यता असते. आम्ही ११ वाजता सफारीला गेलो होतो. आता काही दिसणार नाही असाच विचार केला होता. पण एका ठराविक ठिकाणी ते दिसतात आणि आम्हाला त्यांचे दर्शन झाले. सफारीचे प्रत्येक व्यक्तिचे ३०० रुपये आहेत. बोटीतुन जाताना ते आपल्याला ५ पाईंट दाखवतात. त्यामध्ये अगुआडा किल्ल्याची खालची बाजु ,भूगर्भ कारागृह, फोर्ट अगुआडा आहे. 

कोको बीचच्या बाजुला शॉपिंग स्टॉल्स, काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळण्यांचे स्टॉल्स आहेत. त्यांनंतर आम्ही अगुआदा फ़ोर्ट ला गेलो. तिथे फिरण्यासाठी साधारण एक तास लागतो. किल्ल्याला जाण्यासाठी एन्ट्री ५.३० पर्यन्त आहे. येथे एन्ट्री फी आकारली जात नाही. किल्ल्याला जाताना अगोदर १ किमी अंतरावर एक चर्च आहे. तिथे मुलांना खेळण्याची साधने आहेत. परत जाताना आम्ही किल्ल्याच्या खालच्या भागात असलेले जेल तिकडे गेलो होतो. तिथे पुर्वी कैद्यांना ठेवले जात असे. 
दुपारची वेळ झाल्याने नंतर आम्ही जेवायला गेलो व जेवण करुन संग्रहालय बघायला गेलो. गोवा राज्य संग्रहालय हे राज्याचे पुरातत्व संग्रहालय आहे. गोव्याच्या समृद्ध इतिहासावर आणि संस्कृतीवर प्रकाश टाकणारे हे संग्रहालय आहे. संग्रहालयात खडक पुतळे, लाकडापासून बनवलेल्या वस्तू, कांस्य, कलाकृती, हस्तलिखिते, असामान्य चांदीची नाणी, संख्यात्मक निवड आणि मानववंशशास्त्र संग्रह यासारख्या आठ हजार अवशेषांचा समावेश आहे. येथे विविध हिंदू तसेच जैन अवशेष आणि शास्त्र देखील आहेत. गोव्यात पाहण्यासारखे हे खरोखर एक उत्तम ठिकाण आहे. बरेच टुरिस्ट वाले हे ठिकाण दाखवत नाही. आपण मात्र विनंती करुन दुपारच्या वेळेत ह्या ठिकाणी जावु शकतो. नंतर आम्ही बागा बीचला गेलो. आमच्यातले काही जण बीचवर पाण्यामध्ये खेळायला गेले. तर काहीजणांनी नुसते शाकवर बसुन रहाण्याचा आनंद घेतला. ह्या बीचवर ही एक चांगली सोय आहे एक तासाचे १०० रुपये देवुन तुम्ही तिथे बसु शकता. फुड ऑर्डर करणे कंप्लसरी नाही.

 

कलंगुट आणि बागा हे गोव्यातील प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत. तिथुन जवळच ५-६ किमी वर चापोरा आणि वेगेटर बीच आहेत. चापोरा हा किल्ला आज उद्ध्वस्त झाला आहे, परंतु पोर्तुगीजांच्या वेळी आपत्कालीन सुटका म्हणून काम करणारे दोन बोगदे अजूनही आहेत. पोर्तुगीजांनी चापोरा किल्ल्यावर १५० पेक्षा जास्त वर्षे राज्य केल्याचे मानले जाते. तटबंदी असलेला हा किल्ला फोटोग्राफीसाठी उत्तम आहे आणि येथून दिसणारा सनसेट प्रसिद्ध आहे. ‘दिल चाहता हे’ ह्या फिल्मचे शुटिंग येथे झाले आहे. सर्वात शेवटचा सीन येथे शुटिंग केला आहे. चापोरा किल्ल्याच्या खालीच चापोरा बीच आहे. चापोरा बीचला संध्याकाळी जाणे योग्य आहे. २००७ ते २०१५ पर्यन्त `सनबर्न फेस्टिवल' हा वेगेटर बीचला होत असे त्यामुळे हा बीच बराच फेमस आहे. तसेच
अश्वेम आणि मॉर्जिम हे देखिल बीच आहेत. दोना पावला बीच बराच काळापासुन 
नुतनीकरणासाठी बंद आहे. गोव्यात बरेच समुद्र किनारे असल्याने एकाचवेळी सर्व समुद्रकिनारे फिरणे शक्य नाही. 

गोव्यातील चर्च तर जगप्रसिद्ध आहे. ओल्ड गोव्यामध्ये ओल्ड चर्च कॅम्पसमध्ये ३ चर्च आहेत. असीसीच्या सेंट फ्रान्सिसची कॅथोलिक चर्च, से कॅथेड्रल चर्च, बाम जिझस चर्चची बॅसिलिका.
सर्व चर्चमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. असीसी आणि से कॅथेड्रलच्या सेंट फ्रान्सिसची कॅथोलिक चर्च एकमेकांच्या पुढे आणि झाडे असलेल्या मोठ्या नयनरम्य हिरव्या बागेच्या एका बाजूला आहे. तर बाम जिझस चर्चची बॅसिलिका दुसर्‍या बाजूला आहे. प्रत्येक चर्चचे एक संग्रहालय आहे. संग्रहालयाची प्रवेश फी १० रुपये, रु. २० आणि रु.५ आहे. बीओएम जिझसच्या बॅसिलिका येथे चर्चच्या आतल्या बारोक वास्तुशास्त्रातील प्रभावी गोष्टी,संग्रहालय ,म्युझिकल फाउंटेन शो हे पहाण्यासाठी आहेत. बॅसिलिका ऑफ बोम जिझस ही रोमन कॅथोलिक बॅसिलिका आहे आणि हे चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत आहे. ह्या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शरीर जतन करुन ठेवले आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर ६ मे, १५४२ रोजी गोवा येथे दाखल झाले. आधुनिक काळातील ते सर्वात मोठे रोमन कॅथोलिक धर्मप्रसारक होते, जे ख्रिस्ती धर्म स्थापनेत मोलाची भूमिका बजावत होते.
बॅसिलिका म्हणजे दुतर्फा खांबांची रांग व अर्धवर्तुळाकार घुमट असलेला प्राचीन 
रोममधील लांबट आकाराचा दिवाणखाना. ह्या चर्चला जुणे चर्च म्ह्णुन पण ओळखले जाते. इथे बाजुलाच म्युझियम देखिल आहे. ते शुक्रवारी बंद असते. फ्रान्सिस झेवियरचा मृतदेह हा दर दहा वर्षांनी लोंकाना दर्शनासाठी खाली ठेवतात. लास्ट टाईम २०१४ साली त्याचे शरीर खाली ठेवण्यात आले होते. जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक ख्रिश्चन आणि ख्रिश्चन-नसलेले ख्रिस्ती देखिल आवर्जुन भेट देतात. येशुला हातात खिळे ठोकुन मारले हे लहानपणापासुन आपण वाचलेले असते आणि तिथे ती मुर्ती बघुन आपल्याला परत त्याची आठवण होते. ट्रिपच्या वेळी चर्चच्या आजुबाजुला कोठेतरी वॅक्स म्युझियम देखिल बघितले होते.


दक्षिण गोवा
दक्षिण गोवा हा ग्रामीण भाग पार्श्वभूमी असलेल्या मंदिर आणि चर्चांनी भरलेले आहे.  दक्षिण गोवामध्ये कमी लोकसंख्या आहे आणि मंदिरांमध्ये दुर्गम स्थान आहे.दक्षिण गोव्यातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मंदिर आणि चर्चना भेट देणे अगदी वेगळा अनुभव आहे. गोव्यातील सर्व मंदिरे फार मोठी आहेत. दक्षिण गोवा मध्ये श्री मंगेश मंदिर हे शंकराचे मंदिर आहे. महालसा नारायणी मंदिर, बालाजी मंदिर, रामक्रुष्ण मठ, श्री शांतादुर्गा मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नागेश मंदिर अ्शी अनेक धार्मिक स्थळे आहेत. मंदिर पार्किंग स्थानापासुन साधारण अर्धा किमीवर आहे.त्यामुळे थोडा दुपारच्या वेळेस उन्हाचा त्रास होऊ शकतो. मंदिरात जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजुंना अनेक वस्तुंची दुकाने दाटीवाटीने थाटलेली दिसतात.ते बघत बघत आपण कधी मंदिराजवळ येतो कळत पण नाही. बाहेर नारळवाले, फळवाल्यांकडे बसुन फळांची प्लेट खाण्याची मजा येते. महालसा नारायणी मंदिरमध्ये रोज दुपारी नाममात्र किंमतीत महाप्रसाद दिला जातो. दुपारी १२.३० ते महाप्रसाद संपेपर्यन्त ही सेवा सुरु असते. प्रत्येक मंदिरासमोर मोठे तळे असते. पारंपारिक हिंदू मंदिरांपेक्षा येथील सर्वच मंदिरे अगदी वेगळी आहेत. 
गोवाला मांडवी नदिवर असणार्या क्रुझवर संध्याकाळी जाण्याची मजा काही औरच. इथे ४०० ते ५०० रुपयांचे तिकीट असते. ते तुम्हाला साधारण एक तास फिरवुन आणतात. त्यामध्ये डेकवर गाणी लावलेली असतात. त्या धुंद वातावरणात डान्स करुन दिवसभराचा थकवा सहज निघुन जातो. बाहेर आल्यावर चांगलीच भुक लागलेली असते. लास्ट टाईम मी क्रुझवर न जाता जरा पणजी शहराचा पायी चालत फेरफटका घेतला. रस्ता क्रॉस केल्यावर पलिकडे एक चर्च आहे. येथे हिंदी सिनेमा जोश मधिल  शुटिंग झाले आहे. तिथे काही मुले मेणबत्ती विकत होते. तेथुन दिसणारे पणजी शहराचे दृष्य मनमोहनीय आहे. 

म्हापसा
पणजी ही जरी गोव्याची राजधानी असली तरी मुख्य बाजारपेठ ही म्हापसालाच आहे. म्हापसा पणजीपासुन १३ किमी. अंतरावर आहे. येथील शुक्रवारचा आठवडा बाजार फार मोठा असतो. येथे दरोरजच बाजार असतो. येथे विविधप्रकारची फळे, मासळी, कपडे, मसाले, काजु, हे सर्व येथे मिळते. आम्ही तिथे हनुमानफळ घेतले होते. हे सिताफळासारखेच असते फक्त साल थोडी जाड असते. आजुबाजुच्या गावातुन आलेले लोक त्यांच्या शेतातील केळी, भाजी, कोकम, फणस, मासळी विक्रीसाठी घेवुन येतात.
मार्केट पासुन जवळच  जुणे श्री बोडेश्वर मंदिर पणजीपासून १२ कि.मी. अंतरावर आहे. हे मंदिर हिरव्यागार वातावरणात वसलेले आहे आणि तेथे एक छोटेसे मंदिर आहे, जे काणकेश्वर बाबा किंवा बडगेश्वर यांना समर्पित आहे. 

थोडे गोव्याच्या अवतीभवती 
गोव्याच्या अवतीभवती देखिल अनेक बघण्यासारखी ठिकाणे आहेत. तर अशीच काही ही ठिकाणे
हरवळे
गोव्यातील डिचोली तालुक्यातील सांखळी या शहरातील ग्रामीण भागात हरवळेगाव आहे. या गावात रुद्रेश्वर मंदिर आहे. रुद्रेश्वर मंदिरापासून हरवळे धबधबा कोसळतो हरवळेमधिल दगडात कोरलेल्या गुहा बघण्यासारख्या आहेत. येथे डोंगरातून वर्षभर कोसळणारा धबधबा आहे. भला मोठा धबधबा आणि घाट तसेच दोन नद्यांचा संगम व निसर्गरम्य परिसर हे या देवस्थानचे वैशिष्ट्य होय. मंदिराजवळच पुरातन  पांडवकालिन गुंफा आहेत. या पांडवकालिन गुंफा मोठ्या डोंगरामध्ये कोरण्यात आल्या असून त्या देवस्थानच्या प्राचीनत्वाची साक्ष देत आहेत. मंदिराशेजारून वर्षभर वाहणारा पाण्याचा पाट आहे. येथे पूर्वी रस्ता नव्हता. आता रस्ता असून मंदिरापर्यंत वाहने नेण्याची सोय केली आहे. वर्षभर या देवस्थानात विविध उत्सव होत असतात. महाशिवरात्र हा या देवस्थानचा सर्वांत मोठा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या दिवशी श्री रुद्रेश्‍वराच्या दर्शनाला इतर राज्यातील भाविकांचीही गर्दी होते, तर श्रावणातील शेवटचा सोमवार मोठ्या थाटात साजरा केला जातो. विशेषतः अंत्यसंस्कार विधीसाठी गोव्याच्या सर्व भागांतून लोक या तीर्थस्थळी येत असतात. 

श्री क्षेत्र दत्तवाडी – सांखळी गोवा
डिचोली तालुक्यात सांखळी हे एक टुमदार शहर वसले आहे. म्हापसा-मडगाव रस्त्यावर डिचोलीपासून ७ कि. मी.वर सांखळी आहे. पर्ये, म्हाविळगे, कारापूर या ठिकाणांचे मिळून सांखळी हे गाव बनले आहे. गावातील बस स्थानकापासून केरी-मोर्लेममार्गे चोर्लेघाटाला जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला जवळच सांखळीचे सुप्रसिद्ध दत्तमंदिर आहे. स्थानिक मंडळी या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात.
श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर 

पुरातन भोजकालीन चंद्रनाथ मंदिर हे टेकडीवर आहे. तेथील दगड अतिशय जुणे आहेत. गोव्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे, जे भगवान शिव यांना समर्पित आहे. असे म्हणतात की चंद्रेश्वर हा भगवान शिवांचा अवतार आहे आणि चंद्रमाच्या देवता म्हणून त्याची उपासना केली जाते. गाडीने किंवा बसने जाण्यासाठी रस्त्याची सोय आहे. परंतु मंदिरापर्यन्त जाण्य़ासाठी सार्वजनिक वाहतुक उपलब्ध नाही. टॅक्सी भाड्याने घेणे किंवा स्वतःची गाडी घेऊन जाणे चांगले. 
जवळच पालोलेम बीच आहे. येथे ८० टक्के लोक हे विदेशी असतात. येथे आल्यावर आपल्याला खरेच विदेशी आल्यासारखे वाटते. हा साऊथ गोव्याचा भाग जरासा लांब असल्याने कमी वेळेसाठी आलेले पर्यटक येथे जात नाहीत. तिकडे लोंकाची वर्दळ देखिल कमी असते. नरेंद्र मोदी यांनी ‘व्हिसा ऑन अरायवल' ही पद्धत लागु केली ते पर्यटनासाठी एक महत्वाचे पाऊल आहे.
दुधसागर धबधबा
हा राज्यातील मांडोवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासुन ६० किमी अंतरावर आहे. दुधसागर धबधबा हा खुप प्रसिद्ध आहे. तेथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.  पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्ट मध्ये याचे दृष्य विलोभनीय असते. दुधसागर धबधबा बराच प्रसिध्द असल्याने येथे दरवर्षी ८ ते १० हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात. हा धबधबा अभयारण्यात असल्याने तेथे जाण्यासाठी वन खात्याची परवानगी घ्यावी लागते. दूधसागर धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात ज्यामध्ये कॅसलरॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे २१ किमीचे ट्रेक आणि धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम यांचा समावेश आहे. पावसाळ्यात दुधसागर धबधबा बघण्यासारखा असतो. बर्याच फिल्म्समध्ये हा धबधबा दाखवलेला आहे. 


तांबडी सुर्ला
तांबडी सुर्ला हे महादेव मंदिर १२ व्या शतकातील शैव मंदिर  आहे. हे मंदिर कदंब काळातील आहे. पणजी शहरापासून हे महादेव मंदिर अंदाजे ६५ किलोमीटर अंतरावर आहे.  वाल्पोई शहरापासून २२ कि.मी. आहे. हे मंदिर शहरापासुन लांब असल्याने लांबचे प्रवाशी येथे कमी जातात. वेळ हातात असेल तर भगवान महावीर अभयारण्य, मोल्लेम नॅशनल अभयारण्य, तांबडी सुर्ला मंदिर असा एक दिवसीय प्लॅन आपण करु शकतो.
 
रसोडा 
गोवा हे टुरिस्ट ठिकाण असल्याने सर्वत्र खाण्यापिण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. आम्ही लास्ट टाईम बरेच जण व्हेज असल्याने रसोडा येथे जेवणासाठी गेलो होतो. रसोडा हे कदंबा बायपास रोडजवळ आहे. रसोडा हे दोन माळ्याचे रेस्टॉरंट प्युअर व्हेज आहे.तिथे वरच्या माळ्यावर जेवणाची पारंपारिक पद्धतीने खाली बसुन जेवण्याची सोय केलेली आहे. आणि  टेबल खुर्ची देखिल आहे. इथे मिळणारी महाराजा थाळी प्रसिद्ध आहे.ही थाळी ४ जण शेअर करु शकतात. तिची किंमत १८०० रुपये आहे. दोघांसाठी मिनी थाळी देखिल आहे. तिची किंमत १२०० रुपये आहे. 
वानोशी फॉरेस्ट होम स्टे
आपल्याला निसर्गात रहायला आवडत असेल तर वानोशी फॉरेस्ट होम स्टे हे उत्तम ठिकाण आहे. वानोशी हे महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यात येते. वानोशी फॉरेस्ट होमस्टेचा विकास “नेचर-फ्रेन्डली रिसॉर्ट” या संकल्पनेवर  आधारित आहे. प्रविण देसाई, त्यांच्या आई हे सर्व बघतात. त्यांच्या व्हरांड्यातूनच पक्ष्यांची काही दुर्मिळ दृश्ये दिसतात. येथे काही सस्तन प्राण्यांचे दर्शनही होऊ शकते. पक्षी प्रेमींसाठी स्वर्ग आणि इतरांसाठी आराम करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. ब्लॅक ईगल, मलबार ट्रॉगन, ग्रे हेड बुलबुल, मलबार पायड हॉर्नबिल, तैगा फ्लायकॅचर, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर, इंडियन पॅराडाइझ फ्लाय कॅचर (पांढरा एन रुफस मॉर्फ), हार्ट स्पॉट वुडपेकर असे अनेक पक्षी दिसतात. नाईट ट्रेल ला तुमचे नशिब बलवत्तर असेल तर तुम्ही भारतीय गवा देखिल बघु शकतो. तिथे असलेल्या नदीवर तुम्ही राफ्टिंग, मनसोक्त मजा करु शकतो किंवा फक्त किनार्यावर आरामात बसु शकतो. तुम्ही ट्रेकिंग, निसर्गात चालणे, वन्यजीव छायाचित्रण, बटरफ्लाय गार्डन फिरणे काहीही करु शकता. तिथे रहाण्याची, जेवणाची अत्यंत योग्य दरात व्यवस्था केली जाते. तर पुढच्या वेळी नक्की भेट द्या.
प्राचीन परंपरा 
पेरणी जागर
गोव्यातील अंत्यत प्राचीन परंपरा लाभलेले लोकनाट्य म्हणजे ‘पेरणी जागर’ पेरणी जमातीकडुन सादर केला जाणारा तो कलाप्रकार आहे. रंगविलेले लाकडी मुखवटे घालुन वांद्याच्या तालावर रात्रभर ग्रामदेवतेसमोर सादरीकरण करतात. 
कोकणातील दशवतार देखिल गोव्यात लोकप्रिय आहे. 
शिग्मोत्सव एकदा आम्ही होळिच्या अगोदर गोव्याला जात असताना १०-१५ मुलांच्या ग्रुपने आमची गाडी आडवली. आम्हाला तर काही समजेणाच काय झाले. नंतर कळाले ते होळी म्हणजे शिमग्याची वर्गणी गोळा करतायत. लोक हा सण शिग्मोत्सव म्हणूनही संबोधतात. येथील होळी पण जरा वेगळी असते. एक मोठा लाकडी ओंडका घेतात व त्याला हिरव्या पानांने सजवतात. लोक छत्री तसेच छोट्या छोट्या छडी धरतात व नृत्य करतात.
साओ जोओ उत्सव
हा उत्सव  दरवर्षी 24 जून ला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.या दिवशी कॅथोलिक समुदाय सेंट जॉन द बाप्टिस्टला मान देतात. उत्सवांमध्ये ‘सांगोड्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनेक लोकनृत्यांचा समावेश असतो. गावातील लोक, प्रामुख्याने तरुण लोक पाने आणि फळांनी भरलेले मुकुट घालुन नॄत्य करतात. लोक आपल्या सासरवाडीला तसेच मित्रपरिवाराला फळे, गोडधोड देतात.
ख्रिसमस
ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करतात. ख्रिसमस हा आता सर्वच शहरांमध्ये साजरा केला जातो. शाळेला देखिल सगळ्यांना सुट्टी असते. मध्यरात्रीच्या वेळी सर्व लोक जमतात. सगळ्यांची घरे ख्रिसमस ट्री, क्रिब्स, तारे याने सजवलेली असतात.
व्हिवा कार्निव्हल  व्हिवा कार्निव्हल हा गोव्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. गोव्यात पोर्तुगीजांच्या ४५० वर्ष जुन्या उपस्थितीचे स्मरण ह्यादरम्यान केले जाते. ह्या वेळेस शहर पहाटे ३-४ वाजेपर्यन्त चालु असते. रंगीबेरंगी कपडे घालुन लोक अगदी उत्साहात असतात. गोव्यातील हा चार दिवस चालणारा कार्निव्हल फेस्टिव्हलची रथयात्रा सगळीकडे फिरते. पणजीपासुन ते वास्को आणि म्हापसा या
सर्व शहरांमध्ये आनंद पसरविते. कार्निव्हलला प्रवेश शुल्क नसल्यामुळे, सर्व वयोगटातील लोक त्यात भाग घेतात. त्यावेळी तिथे खुप गर्दी असते. 
 महिला टॅक्सी गोवा टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ऑक्टोबर २०१४  रोजी गोवा राज्यातील महिला आणि कुटुंबांसाठी केवळ महिला टॅक्सी सेवा सुरू केली आहे. सर्व महिला ड्रायवर ने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेले आहे. सर्वाचा गणवेष हा सफेद कलरचा आहे. ही सेवा गोवा राज्यात प्रवास करण्यासाठी सुरक्षित आणि उत्कृष्ट आहे. फसवणुकीचा कुठलाही प्रकार येथे नाही. पुरुषांना देखिल ही गाडी वापरता येईल पण त्यासाठी एकतरी महिला सोबत असावी. संपूर्ण गोवा राज्यात ही सेवा कॉल सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध आहेत, कॉल सेंटर देखील स्थानिक, महिला, इंग्रजी आणि स्थानिक भाषेमध्ये आहेत. टॅक्सीमध्ये आधुनिक जीपीएस गॅझेट्स देखील आहेत.संपर्क क्रमांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्यांची ब्लॉगर यादी

Esahity pratishtan, ई साहित्य प्रतिष्ठान