कोरीगड किल्ला


पावसाला आता संपलाय आहे. पण त्याने केलेली जादू संपलेली नाही. पावसाळ्यानंतरचा काळ ट्रेक करण्यासाठी आदर्श काळ आहे आणि अशाच  मोसमात ट्रेकिंगला जाण्यासाठी सह्याद्रीतील पुष्कळ गडांचा पर्याय आपल्या समोर आहे.  असाच एक गड आज आपण पाहू फारसा कोणाला माहित नसलेला आणि त्यामुळे आपल्याला हवी ती शांतता मिळणारा. आपल्या देशामध्ये आणि इतर राज्यातही प्राचीन किल्ले,महाल, राजवाडे, मंदिर अस खूप काही बघण्यासारखे आहे. पण महाराष्ट्राचे खरे वैभव सह्याद्रीयाच्या कड्यांवर छाती पुढे काढून उभे राहिलेल्या  किल्ल्यामध्ये आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.बऱ्याच  किल्ल्यावर आणि उंच डोंगरावर आपल्याला वेगवेगळी मंदिर आणि त्या-त्या किल्ल्याच्या नावाशी निगडीत देव किंवा देवी आढळतात.या किल्ल्यावरून देव-देवींना नाव पडले कि देव-देवींवरून किल्ल्याला नाव पडले हे सांगणे अवघडच. अशाच एका गडाला आपण भेट देत आहोत....... कोरीगड किंवा कोराईगड नावाने ओळखला जाणारा एक शांत आणि मजबूत गड. कोरीगडला भक्कम तटबंदी आणि भलमोठ पठार लाभलेले आहे. सद्यस्थितीलाही या अखंड असलेल्या तटबंदीमुळे हा गड किती मजबूत असेल याचा अंदाज येतोपावसाने आपली जादू या पठारावर केलेली असते. पठाराने जणू काही हिरवा  गालीचा अंथरला आहे असे वाटते.गडावरून दिसणारे दृश्य अतिशय मनोहर आहे. ह्या एवढ्या उंचावर धुके कधी येते आणि आपल्याला भेदून जाते ते समजत देखील नाही.

इतिहास :

कोरीगड ह्या मध्यम आकाराच्या किल्ल्यावर सन १७३७ मध्ये २०० शिबंदी होती. शिबंदी म्हणजे गडावरील सैनिक. घाथमाथ्याच्या कडेला एकाच वेळी देश कोकणातील विस्तृत मुलुखाचे दर्शन घडविणारा हा सुंदर असा किल्ला आहे.या गडाचा इतिहास फारसा कुठे उल्लेख केलेला नाही. गडावरील गुहेमुळे हा  गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात. .. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी या परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. .. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला. ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला.इंग्रजांच्या हल्ल्याला गडावरच्या मावळ्यांनी तीन दिवस अत्यंत कडवा प्रतिकार केला. मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली.इंग्रज तोफ्यांच्या माऱ्यान  गडावरच दारूगोळ्याच कोठारच उडाल, तेव्हा नाइलाजाने  मावळे शरण आले. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला. गडाचा ताबा घेतलं तेव्हा इंग्रजाना गडावरील कोराई  देवीचे दागिने मिळाले. ते त्यांनी मुंबईच्या मुंबादेवीला दान केले अशी माहिती मिळते.
लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आयएनएस शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी एस. टी. पकडावी किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या  (आयएनएस शिवाजीच्या) पुढे २२ कि.मी वरील पेठशहापूर गावात उतरावे. पेठशहापूर गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. इथे मात्र वेळ घालवता तडक कोरीगडाकडे निघायचे. गडाचा कडा उजवीकडे ठेवत पुढे सरकायचे. आम्ही इथे रस्ता चुकलो आणि सरळ वरती गेलो. पुढे गेल्यावर गडाचा सुळका आला. इथे मस्त फोटो काढले. पण तो रस्ता तिथपर्यंतच होता. तेव्हा कळले की आम्ही रस्ता चुकलो. त्याचवेळी खाली एक ग्रुप दिसला. त्यांना आम्ही आवाज दिला असता त्यांनी खाली या आणि रस्ता ह्या बाजूला आहे असे खुणवले. तसेच खाली जाणे शक्य नव्हते कारण वाटेत काटेरी झुडपे होती.त्यामुळे आलो त्या वाटेने खाली वळलो. तेवढ्यात जोरात पाऊस चालू झाला. त्यावेळी मनात विचार आला, गडावर जाण्याचा दिशादर्शक  फलक का बरे कोणी लावले नाही? तसेच पावसात भिजत रान वाटेतून चालत राहिलो. पुढे कोणी एका गिर्य प्रेमींनी दगडावर दिशा दर्शविणारा बाण काढला होता. तेव्हा जरा हायस वाटल आणि हसू आले. कारण ह्या गडावर जायचा बेत करत असता मित्र परिवार म्हणत होते शिवाजी महाराजानंतर कोणी गेले नाही म्हणून याला कोरागड म्हणजे कोरीगड बोलत असतील. .... हि एक मजेची बात झाली.
तिथून पुढे चालत गेल्यावर आत्ताच बांधलेल्या पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्यांनी वर चढत जाताना समोरच दगडावर कोरलेली गणेशमूर्ती दिसते. तेवढा समोरचा पट्टा सपाट आहे. तेथेच उजव्या बाजूस एक गुहा आहे. आम्ही त्या गुहेत गेलो असता आधीच्या ग्रुपने पेटवलेली शेकोटी दिसली. आम्ही सर्वांनी थोडीशी ऊब मिळावी म्हणून शेकोटीचा आधार घेतला आणि घरून आणलेल्या भाजी चपातीचा आस्वाद घेतला. या गडावर  आम्हाला वाटेत अगदी गडद लाल रंगाचे कीटक  आढळले. त्यांची मजा घेत पुढे जात असताना केसरी रंगाचे खेकडे दिसले. तिथूनच जाणारी वाट थोडे वर गेल्यावर गणेश दरवाज्याच्या अलीकडे उजव्या बाजुस पाण्याची टाकी लागते. वरती चढल्यावर आपण गणेश दरवाजा जवळ येतो.
गणेशदरवाज्याने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. समोरच पठारावर कोराईदेवीचे मंदिर आहे. अलीकडे कोराई देवीच्या मंदिराची डागडुजी केलेली दिसते. मंदिरासमोर दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतचार फूट आहे. त्रिशूळ, डमरू, गदा आदि शस्त्रे धारण केलेली मूर्ती प्रसन्नवदनी, चतुर्भुजी आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी लक्ष्मी तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. याचप्रमाणे गडावर आणखी दोन मंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. तळ्यांच्या पुढे आणखी दोन गुहा आहेत. येथेच शंखचक्र गदापद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे.गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे. गडाची तटबंदी साधारणतदीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. कोरीगडावरून कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, ढाकचा किल्ला, राजमाची, तोरणा दिसतो.  कोराई देवी मंदिराच्या उजव्या बाजुस खाली उत्तम तटबंदीचा  आंबवणे दरवाजा दिसतोतिथूनच जाणारी वाट आंबवणे गावात जाते. गडावर येण्याकरिता हि दुसरी वाट आहे परंतु वाट मात्र कठीण आहे.
 गड पाहण्याचं एकदा नाद लागला तर त्यातून सुटका होणे मुश्कील.पण हा नाद एकदा लागला तर त्यातून  मिळणार आनंद अवर्णीय आणि अजून आपण गड बघायला गेलो की त्या गावातल्या  लोकांना आपल्याबद्दल एक आपुलकी असते. त्यात आपण सांगितले की आपण मुंबई पुण्याहून आलो आहेत तर त्यांना अजून अप्रूपच वाटते. ते लोक आदराची वागणूक देतात कारण त्यांना आपल्या गावातील हा किल्ला बघायला  लोक बाहेरून आले आहेत अशी त्यांची भावना असते. हा पण किल्ला शहरात असेल तर वागणुकीत फरक पडू शकतो.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Goa

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती

माझे ग्रंथालय ग्रंथ तुमच्या दारी