सातारा सज्जनगड


सातारा जिल्ह्यामध्ये पहाण्यासारखी अनेक प्रेकशणिय स्थळे आहेत. या ठिकाणाच प्रत्येकाच वेगळ असं वैशिष्ट्य़ आहे. सातार्याला जाण्यासाठी खास निमित्त होत ते चिऊ आणि काऊला भेटायला जाण्याच. ह्या काही गोष्टीतील चिऊ काऊ नाही तर मित्राच्या जुळ्या मुली आहेत. त्यांच्या सोबत चांगला वेळही घालवता येईल आणि थोड साताराही फिरता येईल म्हणुन २६ जानेवारी सोमवारी आल्याने शनिवार रविवार, सोमवार असे तीन दिवस जाण्याचे ठरले. साताराला जाण्याअगोदरच आदित्य फडके यांच सातार्याच्या मुलखात हे पुस्तक वाचण्यात आले होते. पुस्तक वाचुनच सातार्याच्या प्रेमात पडलो होतो. पुस्तक अतिशय सुंदर आणि सुटसुटीत आहे. तेच बरोबर घेऊन सातार्याला गेलो. तिथे त्यांना भेटनार होतो पण वेळेअभावी ते राहुन गेले. चला तर आता करुया सफर सातार्याची..
सातारा हे पुणे, मुंबई, कोल्हापुर ह्या शहरांपासुन जवळ आहे. सातार्याला प्रामुख्याने ओळखले जाते ते ‘शाहुनगरी’ या नावाने. शाहूराजांची आरंगजेबाच्या ताब्यातून मुक्तता झाल्यानंतर, अजिंक्यतार्याच्या पायथ्याशी त्यांनी वसाहत निर्माण करायला सुरुवात केली. वास्तविक शांहुचा बराच काळ आरंगजेबाच्या छावणीत, अनुषंगाने मैदानावर गेल्यामुळे त्यांना सपाट जागेवर राहायला आवडे. त्यासाठी त्यांनी सातार्यात राजवाडा, अदालतवाडा या वास्तु बांधल्या. सातार्याचे सात भाग करून त्याला सात वारांची नावं दिली. काही ठिकाणी तलाव,विहीरीही बांधल्या आणि सातार्याची उभारणी सुरू केली. सन १८५३ मध्ये याला नगरपालिकेचे रुप मिळाल.
सातारकर छत्रपतींच्या वास्तव्यामुळे सातारा शहर आणि परिसराला ऎतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यासंदर्भातील अनेक ऎतिहासिक स्थळे सातारा आणि परिसरामध्ये विखुरलेली आहेत. वाढत्या शहरीकरणामध्येही सातारा आपल पूर्वीच वैभव टिकवून आहे. पर्यटकांसाठी खुप काही राखुन आहे. पर्यटकांची सातार्यातील खास पाहण्याची ठिकाण म्हणजे जलमंदिर, चार भिंती, अजिंक्यतारा, सज्जनगड अदालतवाडा, खिंडीतील गणपती आणि ऎकीवातील राजवाडा.
वाटेत जाताना पंचमुखी गणपती बघितला. पंचमुखी म्हणण्यापेशा पंचशुंडी गणेशमुर्ती आहे.गजाननच्या उत्पत्तीसंबधित ज्या अनेक कथा प्रचलित आहेत.त्यात मालिनी रासीची देखिल कथा आहे. ‘सुप्रभेदागम’ ग्रंथात ही कथा आली असुन त्यात सांगितलेली कथा अगदीच वेगळ्या प्रकारची आहे.
सोमेश्वर (सोमनाथ) येथील शिवलिंगाचा महिमा असा होता की , त्याच्या नुसत्या दर्शनानेही महापातकी सुद्धा स्वर्गात जाऊ लागले. स्वर्गाकडे इतक्या सहजपणे लोटणारा हा अनाधिकारी माणसांचा लोंढा पाहुन देव चिंतेत पडले आणि त्याला आळा घालण्यासाठी त्यांनी पार्वतीस प्रार्थना केली. तेव्हा तिने उटणे आणि आपल्या अंगाचा मळ एकत्र केला आणि ती गडगासागरतीरावर जाऊन पोहोचली. तेथे मालिनी नावाची एक राशसी राहत असे .तिचे तोंड हत्ती सारखे होते पार्वतीने बरोबर आणलेले उटणे व अंगमळ यांचे मिश्रण तेथे टाकताच या मालिनी रासीने ते भण केले. पुढे यथावकाश तिला गर्भ राहुन तिच्या पोटी एक अपत्य जन्माला आले, ते पाच सोंडा असलेले होते. या पंचशुंडी बालकाला शंकरांनी आपला पुत्र मानुन पुढे त्याच्या पाच सोंडा एकत्र करुन एकच सोंड बनवली. यालाच पुढे गणपतित्व आले.या गणपतीनेच पुढे लोंकाना पुण्यकर्मात बाधा उत्पन्न करण्यास सुरवात करुन स्वर्गाकडे जाणारा पातक्यांचा अमर्याद लोंढा थोपविला. त्यावरुन पुण्यकर्म पार पाडण्यासाठी देखिल या विघ्नेश्वर विनायक गणपतीची पुजा करण्याची,त्याला संतुष्ट करण्याची प्रथा पडली.

१९८५च्या मोजणीनुसार सातार्यामध्ये जुनी ९७ मंदिर आणि पाच मोठे तलाव आहेत. यांमध्ये ग्रामदैवत फोडजाई देवी, क्रुष्णेश्वर मंदिर, विश्वेश्वर मंदिर, ठोल्यागणपती, गारेचा गणपती, कोटेश्वर मंदिर, कासार देवी, फुटके तळॆ, मंगळवार तळे, महादरेतळ, साखर तळ, हत्ती तळ ही ठिकाण आहेत. आम्ही मंगळवार तळे बघितले तळॆ अगदी खोल आहे. त्यातील पानी बरेच कमी झाले होते. त्याचा वापर आता गणपती, देवी विसर्जनासाठी करतात असे मित्राने संगितले. शिवाय बन्सापूरीमठ, फाशीचा वड,छत्रपती शिवाजी संग्रहालय ही ठिकाणे देखिल मस्त आहेत.
सर्वात प्रथम आम्ही राजवाडा बघण्यासाठी गेलो. मला वाटले आता मोठा राजवाडा बघायला मिळेल. पण तिथे जाऊन कळाले की हे त्या स्थळाच नाव आहे. तिथे राजवाडा आहे. पण तो बंद आहे. आता त्याच्या घरातील लोक जलमंदिरला राहतात. तेव्हा मला अस वाटत होत की का नाही इथे कोणी राहत किती मोठा वाडा आहे तो.तिथे रहायला काय मजा येईल. राजवाड्यासमोरच प्रतापसिंह गार्डन आहे. गार्डनला नाममात्र एक रूपया फी आहे. गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे खेळ आहेत. टरीवर चालणारी रेल्वे देखिल आहे. लहानांसोबत आम्हीही तिचा आंनद घेतला. राजवाड्यासमोरच मोठी खाऊ गल्ली आहे. वेगवेगळे चायनिजवाले,दाबेली, वडापाव, पानीपुरी, इडली-उत्तपा, चिकन, भेळवाले, फुगेवाले, घोडाफेरी हे कायमस्वरुपी दिसुन येतात. पण इथे सुळेगावकर यांचा मिळणारा वडा आणि चटनी, उपवासाची कचोरी अगदी अप्रतिम आहे. त्यांनी गाडीतच किचन बनवले आहे. खास तशी गाडी बनवुन घेतली आहे. बाजुला तशीच इडली-उत्तपा यांची गाडी होती.चालते फिरते होटेल. पण ते मुळचे तिथलेच.मी काही  फार खवय्यी नाहिये. पण खरच फार वेगळी चव होती ती. चटनी तर अप्रतिम. आणि आकार देखिल मोठा. तोही दहा रुपयातच तुम्ही नक्कि ट्राय करा.
राजवाडा नावाचे बसस्थानक देखिल आहे. तिथुन शहरात जानार्या बसेस सुटतात.
किल्ला सज्जनगड
सातार्यावरुन सज्जनगड हा किल्ला १८ कि.मी.वर आहे. शिलाहारांनी याची ११ व्या शतकात उभारणी केली. प्राचीनकाळी अश्वलायन त्रषींची तपोभुमी, त्यामुळे या किल्ल्याच प्राचीन नाव ‘अश्वलायन गड’ हे होत. पायथ्याशी असणार्या परळी गावामुळे याला परळीचा किल्ला हे नाव दिले.बहामनी सत्तेची शकले झाल्यावर विजापुरच्या आदिलशहाकडॆ हा किल्ला होता. आदिलशहाच्या काळामध्ये याला ‘नवरसतारा’  हे नाव होत. २ एप्रिल १६७३ या दिवशी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला.पुढे ९ जुन १७०० या दिवशी औरंगजेबाने हा किल्ला जिंकुन घेतला. औरंगजेब गेल्यानंतर इ.स.१७०९ मध्ये सज्जनगड शाहु महाराजांच्या ताब्यात होता. अखेर इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकला. अशी विविध नावे धारण करणार्या या गडावरील रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणार्या लोंकाची संख्या मोठी आहे. सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावातील यादवकालीन मंदिरे आवर्जुन पाहावी.
राजवाडा बसस्थानकातुन नियमित बस सज्जनगडला जातात. दर एक तासाने बस गडावरती जाते. सज्जनगडाच्या कातळ पायथ्यापर्यन्त गाडी येते. इथुन पायर्यांनी चालत गेल्यावर प्रथम उजव्या बाजुस एक जुने कामधेनू मंदिर आणि समोरच एक हनुमान मंदिर आहे.
           
वरती जाताना लागलेले हे शेंगाचे झाड.



रस्त्याने वरती जाताना मधे मधे स्थापित केलेले ११ हनुमान मुर्त्ती आहेत. त्या समर्थानी स्थापित केलेल्या ११ मारुंतीची प्रतिक्रुती आहेत.
        

        

        

        

      

 इथुन वरती गेल्यावर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार लागते.
ह्या उंच आणि रेखिव महाद्वारातुन आत गेल्यावर पुढे समर्थ महाद्वार लागते. या दरवाज्यामागे पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.दरवाजातुन आत आले की उजव्या बाजुला एका काळ्या पाषाणात छोटासा लेख कोरलेला दिसतो.
गडाच्या कातळपायथ्यापासुन जवळजवळ १५० पायर्या चढल्यावर गडाचा माथा येतो. समर्थ महाद्वारतुन पायर्यांनी वर आल्यावर एक झाड लागते तिथुन एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर एक रामघळ लागते.ही रामघळ समर्थाची एकांतात बसण्याची जागा होती.
आणि माथ्यावर डाव्या बाजुला आल्यावर ‘घोडाळे तळे’ नावाचे तळे आहे.
      




तळ्याशेजारी पडक्या अवस्थेतील एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरातील देवीची स्थापना समर्थानी केलेली आहे. ही देवीची मुर्ती समर्थांना कोरेगाव तालुक्यातील अंगापुर गावाच्या डोहात सापडली. या डोहामध्ये समर्थांना श्रीराम आणि तुळजाभवानी या दोन मुर्ती सापडल्या. यांपैकी श्रीराममुर्ती त्यांनी चाफळमध्ये आणि तुळजाभवानीची मुर्ती सज्जनगडावर स्थापली. तुळजाभवानीची ही मुर्ती काळ्या पाषाणाची आहे. मंदिरासमोर ध्वजस्तंभाचा बुरुज आहे. आंग्लाई देवी कडुन पुन्हा आल्यामार्गे परत यावे. उजव्या बाजुच्या चढणीवर गेल्यावर एक बांधीव तलाव आहे. या तलावाच्या पुढे समर्थशिष्य़ कल्याणस्वामी यांनी समर्थाच्या अंगावरील उडालेल्या छाटीसाठी  दरीत मारलेल्या  उडीचे स्मारक,कल्याण छाटीस्मारक आहे.इथुन पुन्हा मुख्य वाटेवरुन पुढे गेल्यावर डाव्या बाजुला श्रीधर कुटी, आणि त्याच्या समोरच पेठेतील मारुती आहे. पुर्वी या परिसरात गडावरील मुख्य वस्ती म्हणजे पेठ असावी, म्हणुन या ठिकाणी असणार्या हनुमान मंदिराला पेठेतील मारुती म्हणतात. समर्थ गडावर राहण्यासाठी आले त्या अगोदरपासुन हे मंदिर आहे.मंदिरातील मारूतीच्या मुर्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे या मारुतीचे तोंड उघडे आहे.
या मारूती मंदिराच्या मागच्या बाजुला पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारे  ‘सोनेरे तळे’ नावाचे तळे आहे. या तळ्यामध्ये उत्तर बाजुस काही प्राचीन गुंफा आहेत. पण सध्या पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्या पाण्यातच असतात.
वाटेत अनेक दुकाने थाटलेली दिसतात.
   
पुढे घेल्यावर अशोकाची झाडे लावलेले अशोकवन आहे. अशोकवनात उजव्या बाजुला समर्थशिष्य़ा अक्काबाई यांचे व्रंदावन आहे.
अशोक वनाच्या समोरच गडावरील मुख्य वास्तु म्हणजे श्रीराम मंदिर आणि समर्थ – व्रुंदावन. या मंदिराची बांधणी संभाजीराजांनी केलेली आहे. श्रीराम मंदिरामधील श्रीराम, लक्श्मन सीता, हनुमान यांच्या मुर्ती  तंजावरमध्ये अरणीकर नावाच्या अंध- कारागिराकडुन बनवुन घेऊन,शिवाजीराजांचे बंधु व्यंकोजीराजे यांनी समर्थाना भेट दिलेल्या आहेत. या मुर्तीसमवेत रामदासस्वामींची एक छोटी मुर्ती हनुमानसन्मुख स्थापलेली आढळते. या सर्व मुर्ती पंचधातुच्या असुन वर्षातुन पाच दिवसच यांची यथासांग स्नान आणि पुजा केली जाते. श्रीराम मंदिराच्या तळघरात समर्थाची समाधी आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत उघड्या शिलेचे दर्शन घेता येते. पुजेनंतर समाधी वस्त्र व फुलांनी आच्छादलेली असते. त्यासाठी भक्तांची गर्दी असते. आम्ही गेलो तेव्हा जास्वंदीची अनेक वेगवेगळ्या कलरची फुले होती. समाधीमंदिरात दिवे लावण्यासाठी १०८ कोनाडे आहेत. मंदिरात समर्थांच्या जीवनाचा माहितीपट, ठळक घटना,  इथे मंदिरात फलकावर लिहलेल्या आहे. दर्शनिय स्थळे व त्यांचा इतिहास इथे लिहलेला आहे.
 सज्जनगडावर श्रीसमर्थ वास्तव्यास आल्यानंतर शिवरायांने दोन हजार होन खर्च करुन एक मठ बांधुन घेतला. श्रीराम मंदिराच्या आवारात उंच जोत्यावर हा समर्थ मठ आहे. शिवकाळात समर्थाचे वास्तव्य इथेच असे.याच मठात त्यांचे देहावसान झाले. या मठात शेजघर या नावाने ओळखल्या जाणार्या खोलीत त्यांच्या नित्य वापरातील वस्तु ठेवलेल्या आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांनी समर्थाना दिलेला पलंग आहे.दिड मीटर उंचीची कुबडी आहे या कुबडीत गुप्ती लपवलेली आहे. पलंगावर रामदासांचे शिष्य़ व तंजावर मठाधिपती यांनी समर्थाना पाहुन काढलेले चित्र आहे. दत्तात्रयाने दिलेली एक नक्शिदार कुबडी, वेताची काठी, आणि मच्छिद्रनाथांनी दिलेला सोटा या वास्तु आहेत. याशिवाय समर्थाच्या नित्य वापरातील पानाचा डबा, पिकदाणी, पिण्याच्या पाण्याचा लोटा या वस्तु आहेत. समर्थ रामदासांसाठी कल्याणस्वामी उरमोडी नदीतुन पाणी आणत असलेले तांब्याचे हंडे आहेत. मारूतीने प्रसाद म्हणुन दिलेले फेट्यासारखे खुमुर्जा वस्त्र, हिमालयातील थंडीच्या निवरणासाठी मारूतीने दिलेली वल्कले देखिल इथे आहेत. अग्निकुंड व प्रताप मारुतीची एक पिवळी मुर्ती अशा समर्थाच्या हस्ते पावन झालेल्या वस्तु आहेत.
श्रीराम मंदिराच्या प्रदशिणा मार्गावर एका कोनाड्यात अकरा मारुतीची स्थापना केलेली आहे. जवळच समर्थशिष्या वेण्णाबाई यांचे व्रुदावन आहे.

गडाच्या मागच्या बाजुला हा तलाव फार सुंदर दिसतो.

ठोसेघर :
स्वत:च्या निसर्गसौद्र्याने पर्यटकांना आकर्षित करणार एक सुंदर ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा आणि चाळकेवाडी. सज्जनगडला जाताना मध्ये ठोसेघर धबधब्याला जानारा फाटा दिसतो. तिथुन ठोसेघर १० कि.मी. वर आहे. गावापासुन पुढे तीन कि.मी. वर ठोसेघर धबधबा आहे. हा धबधबा जितका आकर्षक तितकाच भितीदायक. ठोसेघर हा सातार्यात असला तरी लाल माती, घाट रस्ता आणि दाट झाडीमुळे कोकणात आल्यासारखे वाटते. पावसाळ्यात दरीमध्ये उतरलेल दाट धुक, धबधब्याकडने जाताना आजुबाअजुच्या झाडीतुन पश्यांचे येणारे गोड आवाज अगदी मंत्रमुग्ध करणारे अस्तात.सरकारने वाढती गर्दी बघुन आता पायर्या आणि धबधब्याच्या कातळापर्यत रेलिंगची सोय केली आहे.

जरंडेश्वर :-
सातार्यामध्ये आल. की पुर्व बाजुला एक उंच डोंगर सहजच लश वेधुन घेतो. तो म्हणजे जरंडेश्वर. सातारा परिसरामध्ये असणारे हे सर्वात उंच ठिकाण आहे. खर तर ‘ श्वर’ म्हणजे शंकरस्थान, त्याचप्रमाणे जरंडेश्वर शंकर मंदिर आहे. पण मुख्य मंदिर आहे ते हनुमानाचे.
पुराणामध्ये घडलेल्या अनेक कथा आपल्याला माहिती आहेत. त्यांतील रामायणातील युद्धकांडामध्ये इंद्रजिताच्या बाणाने लक्श्मण जखमी झाला, आणि संजिवनी बुटीसाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलुन आणला, ही गोष्ट तर अगदी बालगोपाळांना सुद्धा माहित आहे. पण द्रोणागिरी पर्वत नेत असताना त्याचा एक छोटासा तुकडा खाली पडला तोच हा जरंडेश्वर.ही गोष्ट मात्र बहुतांशी लोंकाना माहिती नसणारी आहे. या डोंगरावर सर्वत्र आढळणार्या औषधी वनस्पती हीच त्याची साक्श आहे अस म्हणता येईल.
जरंडेश्वरला येण्यासाठी मुख्य दोन वाटा आहेत. एक जांब गावातुन आणि दुसरी पाडळी गावातुन. पण जांबगावाकडुन येणारी वाट थोडी सोपी आहे. कुठुनही वरती आले की वरती एक पिंपळाचे झाड आणि त्याच्या शेजारी एक चौथरा आहे. या चौथर्याच्या बाजुला बाकोबा नावाच्या बोक्याचे एक छोटेसे स्मारक आहे. समोरच गडावरेल मुख्य दैवत हनुमान आणि जरंडेश्वराचे मंदिर आहे. हे जरंडेश्वर मंदिर समर्थानी बांधल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा सभामंड्प १९३० च्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधला. या मंडपामध्ये एका दगडी चौथार्यावर जरंडेश्वराची स्थापना केलेली आहे.
 जरंडेश्वर पाहण्यासाठी साधारणपणे पाऊण ते एक तास वेळ लागतो.
सातारा- जरंडेश्वर अंतर १२ कि.मी. आहे.
 जरंडेश्वरला खाण्याची अथवा पिण्याची सोय नाही.
समर्थस्थापित अकरा मारूती :-
सातारा जिल्ह्यातील तीन मारूती उंब्रजजवळ आहेत. चार चाफळ गावाजवळ आहेत.बहे-बोरगाव , बत्तीस-शिराळा हे सांगली जिल्ह्यात आहेत. आणि मन-पाडळे, पारगाव हे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.
१) उंब्रज (मठातील मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा सहावा मारूती आहे. रामदासांना इ.स. १६४८ साली ही जागा इनाम म्हणून मिळाली. आणि इ.स. १६४९ मध्ये त्यांनी या ठिकाणी मठ, मारूतीची स्थापना केली. या ठिकाणी चैत्र-पौर्णिमाला उत्सव असतो.
२) माजगाव ( माजगाव मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा सातवा मारूती आहे. माजगाव गावाच्या वेशीवर असणार्या दगडाला गावकरी गाव-रक्शक मारूती म्हणत. इ.स. १६४९ साली समर्थांनी या पाषाणाची मुर्ती तयार करून घेतली. आणि मुळच्या ठिकाणीच तिची स्थापना केली. या ठिकाणी चैत्र-पौर्णिमाला उत्सव केला जातो.
३) चाफळ ( प्रताप मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा चौथा मारूती आहे. चाफळ गावातील राममंदिराच्या मागे प्रतापमारूतीचे मंदिर आहे.
४) चाफळ ( दास मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा तिसरा मारूती आहे. चाफळ राममंदिरच्या समोरच दासमारूती आहे. समर्थानी या मारूतीची स्थापना इ.स.१६४८ साली केली.
५) मसुर  ( सुंदर मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा दुसरा मारूती आहे. मसुरमधील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्यास समर्थानी अनुग्रह दिला आणि त्यांच्या घरामध्येच इ.स. १६४५ साली ‘ महारुद्र मारूती’ ची स्थापना केली. या ठिकाणी चैत्र-पौर्णिमाला उत्सव केला जातो.
६) शिंगणवाडी ( खडीचा मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा पाचवा मारूती आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या या अकरा मारूतींमधील हे सर्वात लहान मंदिर आहे. चाफळ गावापासुन अवघ्या दीड कि.मी. अंतरावरील टेकडीवर हे मंदिर आहे.
 इथुन जवळच रामघळ (शिंगणवाडी रामघळ ) आणि कुबडतीर्थ ही ठिकाणे आहेत.
७) शहापूर ( वीर मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा पहिला मारूती आहे. शहापूर  गावातील नदिच्या तीरावर इ.स. १६४४ साली समर्थानी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की, शहापूर गावामध्ये समर्थ रोज शहापूरकर नावाच्या कुलकर्ण्याकडून भिशा आणत. भिशा देताना कुलकर्ण्याची पत्नी सतीबाई समर्थाना उलट-सुलट बोलत असे. असेच एके दिवशी समर्थ त्या घरामध्ये गेले असता बाईंच्या पतीला- बाजीपंताना, आदिलशहाने पकडुन नेल्याचे समजले. भिशा घेऊन झाल्यानंतर समर्थानी बाईला सांगितले की, आजपासुन पाचव्या दिवशी बाजीपंत सुखरुप घरी येतील, आणि समर्थाच्या बोलण्याप्रमाणे पाचव्या दिवशी बाजीपंत सुखरुप घरी परत आले. तेव्हा सतीबाईंना इतके दिवस समर्थाना बोलल्याचा पचाताप झाला. आणि त्या दांपत्याने समर्थदर्शनाशिवाय अन्न-पाण्याचा त्याग केला. समर्थाना हे अंतरनाने कळाले ते तिसर्या दिवशी ते कुलकर्ण्याच्या घरी आले आणि सतीबाईंच्या विनंतीमुळे त्यांनी या मारूतीची स्थापना केली. या मुर्तीच्या डोक्यावर गोंड्याची टोपी आहे. त्याचप्रमाणे या मुर्तीचा चेहराही उग्र वाटतो.
८) बहे – बोरगाव (विक्राळ मारुती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा आठवा मारूती आहे. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे. या ठिकाणी हनुमान- मंदिराव्यतिरिक्त राममंदिरही आहे. या राममंदिरामध्ये राम, लक्श्मण, सीता यांच्या मुर्तीसमोर शिवलिंग स्थापन केलेले आहे. समर्थानी या मुर्तीची स्थापना इ.स. १६५१ साली केली.
९) बत्तीस शिराळा (भव्य मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा शेवटचा म्हणजे अकरावा मारूती आहे. समर्थानी या मुर्तीची स्थापना इ.स. १६५४ साली केली. बत्तीस शिराळे हे गाव नागपंचमीसाठी प्रसिद्ध असल्याने सर्वाना माहीत आहेच. पण याबरोबरच या गावामध्ये काही जुनी देवालयेही आहेत. भव्य मारूती मंदिरही त्यापैकीच एक आहे. अकरा मारूतींमध्ये सर्वात सुंदर असणारे हे मंदिर आहे.
१०) मन – पाडळे (विशाल मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा नववा मारूती आहे. समर्थानी या मुर्तीची स्थापना इ.स. १६५१ साली केली. नदीच्या काठावर स्थापन केलेल्या या मंदिराची अलिकडेच दुरुस्ती करून मंदिर प्रशस्त आणि भव्य केलेले आहे. मुर्तीशेजारी दीड फूट उंचीची कुबडी ठेवलेली आहे.
११) पारगाव ( गोंडस मारूती) :
समर्थ स्थापनेप्रमाणे हा दहावा मारूती आहे. समर्थानी या मुर्तीची स्थापना इ.स. १६५२ साली केली. या मुर्त्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे हनुमानाच्या केसाची शेंडी बांधलेली आहे. आणि तो धावत निघालेल्या अवस्थेत आहे. मन- पाडळे आणि पारगाव ही ठिकाणे कोल्हापुर जिल्ह्यात आहेत.
 ही सर्व ठिकाणे सातार्यातुन एका दिवसात पाहुन होऊ शकतात. सातार्यातुन एकुण अंतर सरासरी ३५० कि.मी. होईल.
त्रिपुटी :-
सातारा - कोरेगाव रस्त्यावर सातार्यापासुन अवघ्या ११ कि.मी. अंतरावर त्रिपुटी नावाच छोट गाव आहे.
गोपालनाथ महाराजांच्या समाधीस्थानामुळे, हे गाव लोकांना परिचयाचे झाले, पण पर्यटकांच्या द्रुष्टीने अजुनही दुर्ल्शितच आहे. गोपालनाथ महाराज हे एकनाथांच्या परंपरेतील ब्रह्मचारी नाथयोगी.
समाधी मंदिराचे आवार थोडेसे लहान असले तरीही सुंदर आहे. मंदिराच्या मागे बांधीव तलाव आहे. तलावाच्या आणि मंदिराच्या बाजुंनी असणार्या झाडांमुळे इथले वातावरण नेहमी प्रसन्न आणि शांत असते मंदिराच्या बाजुला गोपालनाथ महाराजांचा मठ आहे. मंदिराच्या बाजुला, थोडसे पुढे एक विहीर आहे.
यवतेश्वर :-
सातारा शहराच्या जवळ वायव्य – पशिचम दिशेला असणार्या बंड्या डोंगररांगेमधील जाग्रुत शंकराचे देवस्थान म्हणुन हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रशस्त अशा आवारामध्ये मुख्य मंदिराव्यतिरिक्त (केदारेश्वर ) आणि काळभैरव यांची मंदिरे आहेत. यवतेश्वरला महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या दिवशी हजारो भाविक दर्शनाला येतात. सातारा- यवतेश्वर अंतर १० कि.मी. आहे. राजवाडा बसस्थानकातुन नियमित एस. टी. ची यवतेश्वरला जातात.
शिवपेटेश्वर :-
सातारा – बामणोली रस्त्यावर, कासच्या अलीकडे ९ कि.मी. वर एका टेकडीवर प्राचीन, अपरिचिट शिवपेटेश्वर हे ठिकाण आहे. शिवपेटेश्वर या ठिकाणी सध्या एकच मोठी गुहा शिल्लक आहे. या गुहेमध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. सातारा- शिवपेटेश्वर अंतर १८ कि.मी. आहे. हे ठिकाण  कास – बामणोली रस्त्यावर असल्यामुळे एस. टी. ची सोय आहे.
गोंदवले :-
माण तालुक्यामध्ये माणगंगा नदीच्या काठावर गोंदवले गाव वसलेले आहे. गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने आणि समधिमुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. गोंदवलेकर महाराजांचा जन्म १८४५ साली झाला. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी राममंदिरांची स्थापना केली. त्याचबरोबर लोकांना नामजपाचा आणि अन्नदानाचा महिमा सांगितला. आणि १९१३ साली ते या ठिकाणी समाधिस्थ झाले. या मंदिराची उभारणी १९३६-३७ साली झाली, आणि भाविक या ठिकाणी नित्य दर्शनासाठी येऊ लागले. प्रचंड असणार्या मंदिराच्या आवारामध्ये भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे संस्थानाने भक्त – निवासाच्या तीन – चार इमारती उभारल्या आहेत. फक्त अंथरूण- पांघरुणाची सोय आपण करावी. दुपारी आणि रात्री दिल्या जाणार्या महाप्रसादासाठी एक मोठा मंडप बांधला आहे. दुपारी प्रसाद दीड वाजता बंद होतो.
 गोंदवले गावामध्ये, गोंदवलेकर महाराजांच्या मंदिराबरोबरच थोरले राममंदिर, धाकटे राममंदिर, शनीमंदिर, दत्तमंदिरसुद्धा पाहण्यासारखे आहे . सातारा- गोंदवले अंतर ७१ कि.मी. आहे. गोंदवलेकर महाराज मंदिरामध्ये भक्त – निवास आणि प्रसादाची सोय आहे.
पुसेगाव :-
सातारा – पंढरपुर रस्ता म्हणजे, अनेक साधु- संतांनी पावन केलेला एक वेगळाच मार्ग आहे असे म्हणावे लागेल. कारण या रस्त्यावर अनेक लहान – मोठी धार्मिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. कोरेगावपासुन १३ कि.मी. असणारे पुसेगाव येरळा नदीच्या तीरावर वसलेले आहे. साधारणपणे पाचशे ते सहाशे वर्षापुर्वी इथे एक मोठे अरण्य होते. या अरण्यात नदीच्या तीरावर नाथपंथीयाच्या अकरा लिंगापैकी सिद्धनाथ नावाचे एक लिंग होते. काही वर्षानंतर बारामती तालुक्यातील परिंचे गावचे जाधवराव याचा शोध घेत त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी वसाहत निर्माण करायला सुरुवात केली. त्यांच्यापुर्वी इथे एक धनगर कुटुंब राहत होते. पण, सेवागिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे व समाधीस्थानामुळेच या ठिकाणाला तीर्थशेत्राचे  स्वरुप प्राप्त झाले. त्यांनी प्रवचनाद्वारे या भागामध्ये लोकशिण दिले. काही काळ लोकांनी त्यांना त्रासही दिला. परंतु त्यांनी केलेल्या अनेक चांगल्या गोष्टीमुळे त्यांचे कीर्ती वाढली. सेवागिरी महाराजांनी या भागात मठ, विहीर, दत्ताचे मंदिर बांधले. आणि त्याच्याच खाली १० जानेवारी १९४७ साली ते समाधिस्त झाले. त्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला यानिमित्त एक मोठी जत्रा या गावात भरते. आणि त्यापुढे दहा दिवस चालते. यात्रेकरीता दोन महिने अगोदर नियोजन चालु होते.या वेळी होणार्या कार्यक्रमांमध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.भक्तजनांनी अर्पण केलेल्या नोटांची रक्कम ३०-३५ लाखांच्या घरात जाते. जी चोखपणे मोजली जाते. व तिचा उपयोग समाज उपयोगी कामासाठी केला जातो. सुरवातीला बैलगाडीतुन महाराजांची रथयात्रा केली जात असे. १९५० साली सेवागिरी महाराजांनंतर पहिला मठाधिपती नारायणगिरी महाराज यांनी सागवानी लाकडाचा अतिशय देखणा रथ तयार करुन घेतला. १९९४ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांना नविन रुप दिले आहे. याच वेळी पाच मजली भक्त निवासाची इमारतही बांधली गेली आहे. ट्रस्टतर्फे भक्तगणांसाठी मोफत वाचण्यासाठी धार्मिक ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे.  रथोत्सवयात्रेमध्ये लाखो भाविक येतात. प्रसाद म्हणुन दोन लाख रुपयांचे लाडु वाटप केले जातात. प्रत्येक अमावस्येला व गुरुवारी महाप्रसाद वाटप केले जाते. पुसेगाव ते पंढरपुर अशी आषाढीच्या यात्रेसाठी दिंडी निघते. यात वारकर्यांची जेवण्याची विनामुल्य सोय केली जाते.
सातारा – पुसेगाव अंतर २३ कि.मी. आहे.

नेर :-     
सातारा -  पंढरपुर रस्त्यावर पुसेगावच्या अलिकडे, डाव्या बाजुला, एक रस्ता नेरकडे ज्जतो. या फाट्यपासुन तीन कि.मी. वर नेर गावाच्या बाजुला ‘ नेर तलाव’ आहे. इ.स. १८७३ च्या सुमारास विक्टोरिया या राणीच्या काळात तिने हा तलाव बांधला. तलाव भरल्यावर त्यावरुन पाणी वाहुन जाते. त्या वेळी बांधावरुन पडणारे पाणी एखाद्या मोठ्या धबधब्यासारखे दिसते. शिवाय तलावामध्ये एका छोट्याश्या टेकडीवर चैतोबाचे मंदिर आहे. चैतोबा म्हणजे तुकाराम महाराजांचे गुरु असल्याचे सांगितले जाते. चैतोबाच्या मंदिराकडे जाणारी वाटही जितकी सुंदर आहे तितकीच धोकादायक. भोवती प्रचंड भरलेला जलाशय आणि मधुनच जाणारी छोटीशी पायवाट यांचा आनंद त्या ठिकाणी जाऊनच घेतला पाहिजे. सातारा – नेर अंतर २३ कि.मी. आहे. ह्या ठिकाणी खाण्या – पिण्याची काही सोय नाही.
औंध :-
माण देशातील श्री यमाई देवीचे जाग्रुत देवीस्थान म्हणून एक सुंदर शहरवजा गाव  म्हणजे औंध प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर औंधमध्ये  असणार्या चित्रसंग्रहालय व ग्रंथालयामुळे देशविदेशच्या पर्यटकांच्या हे जास्त परिचयाच झालेल आहे.
औंध सातार्यापासुन अवघ्या ४३ कि.मी. वर आहे. औंधला जवळ असणारे दुसरे छोटे शहर म्हणजे रहिमतपूर. हे शहरदेखिल रेल्वेने जोडलेले आहे. ऎतिहासिक शहर रहिमतपूर आणि तिथली १७ व्या शतकातील रणदुल्लाखानची कबर आणि इस्लामी वास्तु पाहुन पुढे औंधला जाता येते.या गावाच्या नावाबद्दल एक आख्यायिका सांगतात की औंधासुर नावाचा एक रास या ठिकाणी राहत होता. यमाई देवाने त्याचा वध केला. त्याच्या नावावरुनच या गावाला औंध हे नाव पडले. त्या ठिकाणी औंध गावामध्ये आणि गावाजवळच्या टेकडीवर यमाई देवीची दोन मंदिर आहेत. टेकडीवर असणार देवीच मुळ मंदिर तटबंदिमध्ये उभारलेल असुन दुरुन हे अगदी जेजुरीच्या मंदिराची आठवण करुन देत. औंध गावातुन टेकडीवर, मंदिरात जाण्यासाठी साधारण्पणे ४७५ पायर्या आहेत.पण पर्यटकांच्या आणि  भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे आता मंदिरापर्यंत डांबरी रस्त्याची सोय करण्यात आली आहे. मंदिरातुन पायर्यांनी किंवा रस्त्याने परतीच्या मार्गावर लश वेधुन घेतो तो भवानी संग्रहालयाचा फलक. या संग्रहालयाची स्थापना सन १९३८ मध्ये भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंडित प्रतिनिधी यांनी केली. त्यांनी जमवलेल्या अनेक दुर्मिळ गोष्टी इथे प्रदर्शानात ठेवल्या आहेत. श्री भवानी चित्रसंग्राहलय व ग्रंथालयाचा विस्तार एकुण अठरा प्रशस्त कला विभागांचा असुन, त्याखाली आणि वर अशा दोन विभागात आहे. तेथे सहा वेगळे शिल्प बघायला मिळाले .ते शिल्प म्हणजे वर्षा, ग्रीष्म, वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद ह्या सहा प्रमुख त्रट्तुंना  स्रीरुपात कल्पना करुन ते एकेकाचे शिल्प बनविले आहे. हे तर आपल्या कल्पनेच्याही पलिकडे आहे. संग्रहालयाच्या मध्यभागी एक फार मोठा बुद्धिबळाचा पट आहे. पण या पटावर सोंगट्या आहेत त्या फार वेगळ्या आहेत. ते म्हणजे युद्धासाठी सज्ज असलेले वेगवेगळ्या वेषातील सैनिक. आहे की नाही काहितरी वेगळे. अजिंठा येथिल चित्राच्या बहुमोल प्रतिक्रुती देखिल इथे बघायला मिळतात. हस्तिदंतात कोरलेल्या वस्तुंचा एक विभाग इथे स्वतंत्र आहे. हस्तिदंतामध्ये छोटी व्यक्तीशिल्पे देखिल आहेत. श्रीमंत भवानराव व इतर व्यक्तींची शिल्प आहेत ती. आतापर्यन्त फक्त वस्तु बघितल्या होत्या पण अशा हस्तिदंतात व्यक्तींची शिल्पे बघितली नव्हती. अजुन एक वेगळे म्हणजे चंदनाच्या लाकडात कोरलेली श्रीदेवी यमाई आणि दुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे चंदनात कोरलेले  ‘ शिवचरित्र ’ अगदी अप्रतिम.ह्या संग्राहलयाच्या नावात ग्रंथालयचा उल्लेख येतो कारू इथे फार मोठे ग्रंथालय आहे. आज शेकडो दुर्मिळ पुस्तके अभ्यासकांसाठी इथे उपलब्ध आहेत. इथे आम्हाला बघण्यासाठी वेळ मिळाला नाही. पण हरकत नाही त्यामुळे तर परत येऊ आम्ही. ह्या संग्रहालयात बरेच काही बघण्यासारखे, समजुन घेण्यासारखे आहे. ते बघायला जाताना अगदी वेळ काढुन गेले पाहिजे तरच त्याच्यात मजा आहे . आता हे संग्रहालय महाराष्टराच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाच्या ताब्यात आहे. भवानी संग्रहालयाची वेळ सकाळी १० ते ५.३० पर्यत आहे. या ठिकाणी चहा- भजीची सोय होऊ शकते, पण मुक्कामाची मात्र सोय नाही. औंध गावापासुन ९-१० कि.मी. वर सिद्धेश्वर – कुरोली गावामधील सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिरही पाहण्यासारखे आहे. शिवाय गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेने गावामध्ये १९११ साली बांधलेले राममंदिरही पाह्ण्यासारखे आहे.
कास पठार आणि कास तलाव :
कास पठार २०१२ साली एकदम प्रसिद्धीत आले ते जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव सामावल्यामुळे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत इथे फार वेगळ्या वनस्पती फुलतात. सर्व पठार रंगीबेरंगी होऊन जाते. तब्बल १४५२ प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजाती इथे फुलतात. ते बघणे म्हणजे खर तर एक सोहळा असतो. निसर्गाच्या चमत्काराची अनुभुती इथे पहायला मिळते. कास पठाराचे सर्वात महत्वाचे म्हणजे इथे फुलणार्या दुर्मिळ वनस्पती आणि त्याची साक्श  देणारे हे दुर्मिळ स्थळ.यातील काही त्रुण, काही वेली, तर काही छोटीशी झुडपे. काही वनस्पती या फार जुन्या पण आहेत.‘ वायुतुरा ’ ही वनस्पती केवळ याच पठारावर आढळते. हिला मधोमध ‘वाय’ आकाराचा एक तुरा फुलतो.गेल्या काही वर्षात दिसणारी वनस्पती मात्र आता अभावानेच दिसायला लागली आहे.पच्छिम घाटातील ३९ स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला. पण महाराष्ट्रापुरते बोलायचे तर फक्त चार स्थळांचा यात समावेश झाला. त्यापैकी एक कास पठार, चांदोली, कोयना, राधानगरी ही चार स्थळे. पच्छिम घाट बोलायचे म्हणजे गुजरातमधिल तापी नदीपासुन जवळजवळ कन्याकुमारीपर्यंतचा हा प्रदेश. जागतिक वारसा स्थळांच्या सरंण संवर्धनाबाबत युनेस्को महत्वाची भुमिका बजावते. पच्छिम घाटाचा समावेश जागतिक वारसा यादीत समावेश झाला म्हणजे आपला विजयच आहे. पण त्याबरोबर आपली जबाबदारी न संपता उलट ती वाढली आहे. उलट शासन,स्वंयसेवी संस्था, स्थानिक लोक, पर्यटक, नेचरलव्हर, आणि सर्व लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे ती त्याच्या संवर्धनाची.वाढते पर्यटन, पवनचक्क्या वाढ्ती बांधकामे, आणि अभ्यासकांमुळे पठाराला धोका निर्माण झाला आहे. जर अश्या ह्या स्थळाला कुठला गंभीर धोका निर्माण झाला, वारसा स्थळ म्हणुन त्याची काळजी घेतली गेली नाही तर असे स्थळ त्या यादीतुन वगळण्याचा धोका देखिल असतो. हे काही एकदम करत नाही. आधी ते धोकादायक यादीत टाकुन, संधी देऊनच पुढचे पाऊल टाकले जाते. ह्यापुर्वी ओमान आणि जर्मनीबाबत असे झाले आहे म्हणुन तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे त्या यादीतुन वगळले जाणे ही किती लाजिरवाणी आणि अपमानास्पद बाब आहे.त्याअर्थी युनेस्कोचा निधी बंद होणे असाही अर्थ असतो. सो बी केअरफुल !
सातार्याहुन यवतेश्वराच्या रस्त्याला लागल्यावर एका डोंगराच्या धारेवरुन पुढे हा रस्ता कास तलावाकडे जातो.इथे जाताना आजुबाजुला एक विशिष्ट्य प्रकाराचे डोंगर दिसतात. त्यांचे माथे तासुन काढल्यासारखे सरळसोट आहेत.
कास तलाव बराचसा महाबळेश्वरच्या वेण्णा तलावासारखा आहे. रस्ता तलावाला वळसा घालुन कास गावाकडे येतो. कास गावाबाहेर कासाई देवीचे मंदिर आहे. व काठावरच हिरव्या रंगाचे गेस्ट हाउस अतिशय सुरेख दिसते.
थंड हवा, घनदाट झाडी, लाल माती या सर्व गोष्टी छान वाटतात.
ब्रम्हेंद्रस्वामींचे धावडशी :
शाहु छ्त्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे यांचे गुरु असलेले ब्रम्हेंद्रस्वामी एक विलण व्यक्तिमत्व होते. सातार्यापासुन २५ कि.मी. असलेल्या धावडशी गावी ते कोकणातुन येऊन स्थायिक झाले. परशुरामाचे निस्सिम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला भार्गवराव मंदिर बांधले. त्यांचे प्रस्थ एवढे होते की जंजिरेच्या सिद्दीच्या सरदाराकडुन चिपळुणच्या परशुराम शेत्राची नासधुस झाली तर त्यांनी सिद्दीकडुनच नुकसान भरपाई म्हणुन ते देऊळ परत बांधुन घेतले. धावडीशीचे भार्गवराव मंदिर मोठे पहाण्यासारखे आहे.
 पाण्याचे तीन मोठे हौद बांधुन जनावरे आणि माणसांसाठी स्वतंत्र सोय केली आहे. मंदिरावरील मुर्तिकाम पण पहाण्यासारखे आहे. झाशीची राणी लश्मीबाई हिचे माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी असे म्हटले जाते. पण मी मागे वाचले होते की जळगावला त्यांचे माहेरचे गाव आहे.. शोधुया नक्की काय ते.
सातारा- धावडशी- मेरुलिंग-लिंब-गोवे-सातारा हा एक दिवसाचा प्रवासमार्ग करता येईल. लिंब गावी बासुंदी फार रुचकर मिळते.
एकट्या सातार्यात २७ एक किल्ले आहेत. त्यांची सैर आपण नंतर करुयाच. खास सातार्याचा आपला अजिंक्यतारा बघायचा राहिला आहे. आणि छॊटी मोठी बरीच ठिकाणे आहेत.
    





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Goa

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती

माझे ग्रंथालय ग्रंथ तुमच्या दारी